लांजा : लांजा शहरात मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी भूसंपादन करण्यात आलेल्या व मार्किंग केलेल्या जागेवर अतिक्रमण केलेली सर्व बांधकामे गुरुवारी पोलिस बंदोबस्तात हटवविण्यात आली.
तत्पूर्वी, शहरातील सर्व व्यापार्यांची महामार्ग प्रशासनाला सहकार्य करून आपल्या दुकानातील साहित्य सुरक्षित जागी हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर प्रशासनाने कडक पोलिस बंदोबस्तात बुलडोझरच्या सहाय्याने बांधकामे तोडली.
महामार्गाने मार्किंग केलेल्या जागेवरील सर्व बांधकामे हटवा अन्यथा त्यानंतर पोलिस बंदोबस्तामध्ये व शासकीय नियमाप्रमाणे सर्व बांधकामे काढून टाकण्यात येतील, अशा सूचना राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून येथील व्यापार्यांना दिल्या होत्या. त्यामुळे शहरातील व्यापार्यांनी आपली बाधित होत असलेली दुकाने व दुकानातील साहित्य स्वतःहून सुरक्षित ठिकाणी हलवली.
लांजा तालुक्यातील मठ, अंजणारी, वेरळ, देवधे, कुवे, वाकेड या ठिकाणी महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाने वेग घेतला असून, या ठिकाणचे काम जवळपास पूर्णत्वाला येत आहे. मात्र, लांजा शहरात महामार्ग चौपदरीकरण कामाबाबत प्रश्न निर्माण झाला होता. शहरात गेली सात वर्षापासून काम रखडलेले होते. लांजा शहरात सद्या उड्डाण पुलाच्या पिलरचे काम सुरू आहे.
अर्धवट कामाच्या त्रासामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी व व्यापार्यांनी सातत्याने आवाज उठवल्याने महामार्ग विभागाने लांजा बाजारपेठेत तीन वर्षानंतर पुन्हा काम सुरू केले. त्यामुळे महामार्ग विभागाकडून गुरुवारी संबंधित व्यापारी, टपरीधारक व्यावसायिक यांना सूचना दिल्याने व्यापार्यांनी स्वतःहून आपल्या दुकानामधील साहित्य दुसर्या ठिकाणी स्थलांतरित केले. त्यानंतर महामार्ग विभागाने हस्तांतरित केलेल्या जागेतील दुकाने व बांधकामे पोलीस बंदोबस्तात हटविण्याची प्रक्रिया हाती घेतली. याप्रसंगी लांजा तहसीलदार प्रियांका ढोले, लांजा पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे, महामार्ग विभागाचे अधिकारी उपस्थित होते.