मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून येणारा हप्ता नियमीतपणे लाडक्या बहिणींच्या खात्यात जाणे, ही मोठी जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारवर आहे.
पण लाडकी बहीण योजनेबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. शासन निर्णयात कोणताही बदल होणार नाही, मात्र काही गोष्टींमुळे लाडक्या बहिणींना या योजनेचा फायदा मिळणार नसल्याचे भाष्य मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.
गुरुवारी (ता. 02 जानेवारी) राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीनंतर मंत्री आदिती तटकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत काही तक्रारी आल्या होत्या. आधार कार्ड मिस मॅच संदर्भातील या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे ज्यांचे बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील माहिती जुळत नसेल त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. लाडकी बहीण योजनेबाबत पडताळणीची यंत्रणा तयार करण्यात येत आहे. पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. त्यामध्ये कसलाही बदल होणार नाही, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच, ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहेत. काही महिलांकडून ऑनलाइन अर्ज आणि ऑफलाइन अर्ज आले होते. काही महिलांचे लग्नानंतर स्थलांतर देखील झाले आहे. चारचाकी वाहने ज्यांच्या नावावर असतील आणि तरी देखील ज्यांनी अर्ज केला असेल त्यांच्या नावांचा शोध घेण्यासाठी परिवहन विभागाकडून माहिती घेतली जाईल. आधार कार्ड आणि बँकेतील नावात तफावत असल्यास ते अर्जदार पात्र असणार नाहीत, अशी महत्त्वाची माहिती यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता शेवटच्या आठवड्यात जमा करण्यात आला होता. आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सहा हप्ते महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. म्हणजेच आतापर्यंत महिलांच्या खात्यात प्रत्येकी 9 हजार रुपये जमा झाले आहेत.