दादासाहेब सरफरे विद्यालयात भव्य आयोजन, विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
सचिन मोहिते / देवरूख
बंगाल वॉरियर्स संघात प्रो कबड्डी या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामन्यांसाठी निवड झालेला संगमेश्वर तालुक्यातील ताम्हाणे गावचा सुपुत्र व बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था कनिष्ठ महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी सिद्धेश प्रमोद तटकरे याचा भव्य सत्कार दादासाहेब सरफरे विद्यालय शिवने येथे गुरुवारी संस्था पदाधिकाऱ्याच्याहस्ते करण्यात आला.
बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था व दादासाहेब सरफरे विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयातर्फे गुरुवारी सिद्धेश तटकरे याचा शाल, बुके व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्याच्या आई-वडिलांचा देखील सत्कार करण्यात आला. कार्यक्रमावेळी व्यासपीठावर बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष शांताराम भुरवणे, सेक्रेटरी शरद बाईत, संचालक सचिन मोहिते, संचालक दिनेश जाधव, मुख्याध्यापक प्रकाश विरकर, पर्यवेक्षक महावीर साठे, शिक्षक संजय तटकरे आणि शिक्षक वृंद उपस्थित होते.
प्रो सीजन ११ मध्ये बंगाल वॉरियर्स संघामध्ये सिद्धेश याची निवड झाली होती. हे सामने संपल्यानंतर तो गावी आला. पहिला सत्कार त्याच्या गावामध्ये करण्यात आला. गुरुवारी सकाळी सत्कारापुर्वी सिद्धेश याची बुरंबी येथून लेझीम पथकाच्या तालावर सरफरे विद्यालयापर्यंत वाजत मिरवणूक करण्यात आली.
सत्कारादरम्यान संजय तटकरे यांनी सिद्धेश याची जिद्द, मेहनत, कष्ट आणि केलेल्या खडतर प्रवासानंतर मिळालेले यश याचा लेखाजोखा मांडला. सिद्धेशला त्याच्या घरातुन मिळालेल पाठबळ कौतुकास्पद असल्याचे सांगितले. तसेच ते म्हणाले की या संस्थेने देखील क्रीडा क्षेत्राकरिता भरीव योगदान दिले आहे. त्यांचा वाटा देखील या यशामध्ये आहे असे संजय तटकरे शेवटी म्हणाले.
संस्था उपाध्यक्ष शांताराम भुरवणे म्हणाले सिध्देशच्या सत्कारा दरम्यान विद्यार्थ्यांचा असलेला उत्साह अवर्णनीय असाच आहे. त्यांना अत्यानंद झाल्याचे दिसुन येत आहे. आज सिध्देशचा सत्कार म्हणजे आपलाच सत्कार ही भावना विद्यार्थ्यांबरोबरच तालुकावासियांमध्ये निर्माण झाल्याचे सांगितले. सिध्देश आज आयडॉल बनला असुन त्याचा आर्दश अनेकांनी घेण्यासारखा असल्याचे श्री. भुरवणे यांनी सांगितले.
विद्यालयातील शिक्षक सुहास पाब्ये म्हणाले सिद्धेश याच्यामध्ये अनेकांचे हात आहेत. कनिष्ठ महाविद्यालयात असताना अंतिम सामन्यात विजय खेचून आणण्यात त्याचा वाटा मोठा होता. कोणताही राजाश्रय नसताना देखील त्याची राज्य स्तरापर्यंत निवड झाली होती, हेच त्याचे वैशिष्ट्य आहे. त्याच्या या प्रवासात त्याचे वडील, मामा-मामी यांचा देखील मोठा सहभाग असल्याचे पाब्ये यांनी सांगितले. तर सिध्देश म्हणाला कि तुम्हाला कबड्डीत करिअर करायचे असेल तर खूप मेहनत करा. सरावात सातत्य ठेवा, फिटनेस व डायट महत्वाचे असल्याचे सांगुन, हे यश प्राप्त करण्यासाठी अनेकांचे मार्गदर्शन मिळाल्याचे त्याने आवर्जुन नमुद केले.
फोटो: सिद्धेश तटकरे याचा सत्कार करताना संस्था उपाध्यक्ष शांताराम भुरवणे सोबत शरद बाईत, सिद्धेशचे वडील प्रमोद तटकरे, सचिन मोहिते, दिनेश जाधव, प्रकाश विरकर