मुंबई : विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याऐवजी शाळा प्रशासनाने शाळेत देशभक्ती पर कार्यक्रमांचं आयोजन करावं आणि विद्यार्थ्यंमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करावी, असे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे यावर्षीपासून महाराष्ट्रात शालेय विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाची सुट्टी मिळणार नाही. याऐवजी त्यांना शाळेतील विविध कार्यक्रमांना आणि स्पर्धांना उपस्थित राहावं लागणार आहे.
शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी एक परिपत्रक जारी करून सर्व सरकारी आणि खाजगी शाळांना प्रजासत्ताक दिनी शाळेत दिवसभर देशभक्ती थीमसह विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. “26 जानेवारीच्या दिवशी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्राचा इतिहास, आपली महान संस्कृती आणि देशाचे भविष्य याबद्दल राष्ट्रीय अभिमानाची भावना निर्माण केली पाहिजे. त्यामुळे २६ जानेवारी २०२५ पासून प्रजासत्ताक दिन सर्व माध्यमांच्या सर्व सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये विविध कार्यक्रमांसह साजरा केला जाईल,” असे परिपत्रकात नमूद केलं आहे.