मार्लेश्वरचा वार्षिक यात्रोत्सव ११ पासून
साडवली : राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या स्वयंभू श्री देव मार्लेश्वर तीर्थक्षेत्राला (शिखर) वार्षिक यात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. यावर्षी हा यात्रोत्सव ११ ते १७ जानेवारी या कालावधीत साजरा होणार आहे, तर राज्यात सुप्रसिद्ध असणारा मार्लेश्वर -गिरिजादेवीचा विवाह सोहळा (कल्याणविधी) १४ जानेवारीला साजरा होईल. मकर संक्रांतीच्या या वार्षिक यात्रोत्सवाकडे मार्लेश्वर भाविकांचे आतापासूनच लक्ष लागून राहिले आहे.
राज्य शासनाने मार्लेश्वर तीर्थक्षेत्र ‘क’ दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून घोषित केले आहे. स्वयंभू मार्लेश्वर देवस्थानची महती सर्वदूर पसरली आहे. त्यामुळे मार्लेश्वराच्या भाविकांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मार्लेश्वराच्या वार्षिक यात्रेचा प्रारंभ प्रथेप्रमाणे याच मठातून होत असतो. या उत्सवात पहिल्या दिवशी म्हणजेच ११ ला आंगवली मार्लेश्वर देवालय येथे मार्लेश्वर देवाचा मांडव घालणे, १२ ला मार्लेश्वर देवाला हळद लावणे व घाणा भरणे, १३ ला आंगवली मार्लेश्वर देवालय येथे यात्रा व रात्री १२ वा. मार्लेश्वर पालखीचे शिखराकडे प्रयाण, १४ ला श्री देव मार्लेश्वर व साखरप्याची गिरिजादेवी यांचा मार्लेश्वर तीर्थक्षेत्री विवाह सोहळा, १५ ला मारळ येथे मार्लेश्वराची वार्षिक यात्रा, १६ ला आंगवली गावात मार्लेश्वर पालखीचे घरोघरी दर्शन आणि १७ ला घरभरणीने यात्रोत्सवाची सांगता आहे.