जलतरण स्पर्धेत 8 वर्षातील कामगिरी, देशाचे प्रतिनिधीत्व करण्याचे स्वप्न
सावर्डे : माझी आई डीएड् पदविकाधारक असूनही नोकरी न करता घरी राहून तिने माझ्या आहाराकडे लक्ष दिले.घरकाम सांभाळून स्पर्धेसाठी ती कायम सोबत राहिली. शाळेच्या अभ्यासात वडिलांनी मार्गदर्शन केले. त्यामुळेच मला जलतरणच्या विविध राज्य व राष्ट्रीय पातळीवर आठ वर्षांत ७२ पदकं मिळवता आली. पुढे वैद्यकीय अभ्यासक्रमाला जाऊन जलतरण स्पर्धेत देशाचे प्रतिनिधीत्व करण्याचे स्वप्न आहे, असे राष्ट्रीय जलतरणपटू तन्वी जाधव हिने सांगितले.
तन्वी ही डेरवण येथील एसव्हीजेसीटीच्या इंग्रजी माध्यम शाळेची विद्यार्थिनी. ती सध्या दहावीत शिकत आहे. मुळची गाणे (ता. चिपळूण) येथील रहिवासी. वडील नोकरीनिमित्त कुंभारखाणी बुद्रुक येथे आल्यानंतर मुलांच्या शिक्षणासाठी ते सावर्डेत राहण्यास आले. तिथे त्यांनी त्यांच्या शेजारी लांजा येथील आर्या सिनकर नावाची मुलगी एसव्हीजेसीटीच्या क्रीडा संकुलावर केवळ धावण्याच्या स्पर्धेच्या सरावासाठी आलेली पाहिली.
तिचा दिनक्रम व दररोज पहाटे उठून ती करत असलेला धावण्याचा सरावाचा परिणाम तन्वीच्या मनावर झाला. आपण सुद्धा खेळात चमकावे, असे तिला वाटू लागले. तेव्हा ती आठ वर्षांची होती. तिच्याशी चर्चा करून पालकांनी तिला क्रीडा संकुलाचे जलतरणचे प्रशिक्षक विनायक पवार यांच्याकडे नेले. पवार यांनी या मुलीला पोहण्याचा सराव जमणार नाही, असे सांगितले; परंतु पालकांच्या आग्रहाखातर तिला मार्गदर्शन करण्याचे कबूल केले. यानंतर तन्वीने मागे वळून पाहिले नाही.
दररोज संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर तीन तासाचा पोहण्याचा सराव, योग्य आहार व शाळेचा अभ्यास असे तिचे वेळापत्रक आहे. राज्यभर होणाऱ्या विविध स्पर्धामधून तिचा सहभाग घेऊन तिने पारितोषिके मिळवली आहेत. जलतरण स्पर्धा सुरू होण्यापूर्वी संपूर्ण अंगाला ग्रीस लावावे लागते. स्पर्धा संपल्यानंतर हे अंगावरचे ग्रीस धुवून काढण्यासाठी एक तास स्वच्छतागृहात थांबावे लागते. माझी आई नेहमी सोबत असल्याने याचा मला फार त्रास जाणवला नाही, असेही तन्वी सांगते.
सुरवातीच्या स्पर्धेबाबत सांगताना ती म्हणते, समुद्र जलतरण स्पर्धेत पाण्यात उडी मारल्यानंतर मी अथांग समुद्र पाहिल्यानंतर घाबरून परत मागे वळले; मात्र स्पर्धा संपल्यानंतर प्रशिक्षक पवार यांनी मला खाद्यांवर बसवून खोल समुद्रात नेले. तेथून मी किनाऱ्यापर्यंत पोहत आले. त्या दिवसापासून समुद्रातील पाण्याच्या स्पर्धेची भीती मोडली. शाळेच्या व्यवस्थापनाकडूनही तिला मोलाचे सहकार्य मिळते.
२०२४- नॅशनल स्कूल गेम्स राजकोट, सहभाग प्रमाणपत्र
२०२४- राज्य शालेय जलतरण, डायव्हिंग व वॉटर पोलो क्रीडा स्पर्धा, २०० मी. व रिले द्वितीय.
२०२४- राज्य अम्युचर अॅक्विटिक असोसिएशन १० किमी चिवला बीच चौथा क्रमांक.
२०२२- राज्य शालेय स्पर्धा ५० मी. बॅकस्ट्रोक, द्वितीय.
२०२२- शालेय क्रीडास्पर्धा विभागस्तर ५० मी. बॅक प्रथम व ५० मी. बटर द्वितीय.
२०१८- नॅशनल सी स्विमिंग टुर्नामेंट सिंधुदुर्ग जिल्हा द्वितीय.
२०२३- कोल्हापूर जिल्हा अम्युचर अॅक्विटिक असोसिएशन सहभाग प्रमाणपत्र.
२०२२- राज्य स्पर्धा बारामती फ्री स्टाईल ५० व १०० मीटर तृतीय स्थान