मराठी बाणा, ‘मी मराठी’ सांस्कृतिक कार्यक्रम
चिपळूण/प्रतिनिधी:-वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित कृषी महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी ठेवण्यात आली असून ‘सेलिब्रिटी इव्हिनिंग’, ‘मराठी बाणा’, ‘मी मराठी’, असे एकाहून अधिक सरस सांस्कृतिक कार्यक्रम चिपळूण बहादूरशेखनाका येथील स्वा. वि. दा. सावरकर मैदानात होणार आहेत, अशी माहिती वाशिष्ठी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांनी दिली.
वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित गेल्या वर्षीच्या कृषी महोत्सवात ‘जाणता राजा’ यांसारखे कार्यक्रम ठेवण्यात आले होते. तर सांस्कृतिक कार्यक्रम देखील झाले होते. या कार्यक्रमांना रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे पहावयास मिळाले. यावर्षी देखील कृषी महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी होणार आहे.
दिनांक ६ जानेवारी रोजी सायंकाळी ८ वाजता मनोरंजन अनलिमिटेड अंतर्गत ‘सेलिब्रिटी इव्हिनिंग’, महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील सुपरहिट जोडी नम्रता संभेराव आणि प्रसाद खांडेकर तर सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत, जुईली जोगळेकर व ईशानी पाटणकर यांच्या गाण्याची मैफिल रंगणार आहे.
दिनांक ७ जानेवारी रोजी सायंकाळी ८ वाजता चौरंग मुंबई निर्मित अशोक हांडे प्रस्तुत ७० एम. एम. मराठी कार्यक्रम ‘मराठी बाणा’ होणार आहे. या कार्यक्रमाने महाराष्ट्रातील रसिकांची मने जिंकले आहेत. तर आता वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाने ‘मराठी बाणा’ कार्यक्रमाचे नियोजन करून चिपळूणमधील रसिकांसाठी मोठी संधी मिळवून दिली आहे.
महाराष्ट्र शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर प्रस्तुत महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महासोहळा ‘मी मराठी’ संगीतमय सांस्कृतिक वारसा कार्यक्रम
दिनांक ९ जानेवारी रोजी सायंकाळी ८ वाजता होईल. या कृषी महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आयोजित करण्यात आले असून रसिकांनी या कार्यक्रमांना बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन वाशिष्ठी डेअरी प्रकल्प व्यवस्थापनाने केले आहे.