दापोली पालगड येथील घटना, परस्पर विरोधी तक्रार
दापोली : तालुक्यातील पालगड येथे रस्त्यावर ट्रक समोर कार आडवी घालून चालकाला मारहाण करत गाडीची तोडफोड केल्याची घटना घडली. यामध्ये गाडीचे नुकसान झाले. ही घटना 31 डिसेंबर रोजी रात्री 8ः50 वाजण्याच्या सुमारास घडली. दापोली पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 31 डिसेंबर रोजी एस राजकुमार (42 रा. तामिळनाडू) हा चालक शमनाद के पी याच्यासोबत अशोक लेलँड ट्रक घेऊन अलिबाग रायगड येथून दापोली हर्णे येथे जात होता. पालगड दापोली येथे आला असता त्याच्या ट्रकच्या मागून एक काळ्या रंगाची झायलो गाडी वेगाने आली. त्यातील इसमाने फिर्यादीच्या ट्रक पुढे येऊन गाडी थांबवून गाडी मधून हातामध्ये लोखंडी रॉड घेऊन उतरला. त्याने एस राजकुमार याच्या ट्रकच्या दोन्ही दरवाजाच्या काचा फोडल्या तसेच अन्य दोन मोटार सायकलवरील चार इसम यांनी मिळून ट्रकमध्ये चढून राजकुमार याला व शमनाद केपी याला पाईपने मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून हाताच्या बुक्क्याने मारहाण केली व दमदाटी करत गाडी जाळून टाकण्याची धमकी दिली. म्हणून एस राजकुमार यांनी दापोली पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीनुसार दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परस्पर विरोधी तक्रार दाखल करीत असताना सकलेन शौकत हवा व (24 रा. जामगे मोहल्ला) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 31 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास हवा हा झायलो गाडीतून कामाकरिता महाड येथून येत होता तेव्हा त्याचे मित्र मुनीफ अब्दुल गणी खलपे हवा यांच्या मागोमाग टू व्हीलर घेऊन येत होता. शीरखल स्टॉपच्या पुढे आला असता मच्छीच्या गाडी गाडीवरील चालक शमनाथ के पी हा मागून जोराने हॉर्न वाजवत होता. म्हणून हवा याचे मित्र मुनीफ अब्दुल खल्फे यांनी रस्त्याच्या बाजूला आपली गाडी लावली. तेव्हा मच्छीच्या गाडीवरील चालक व एस राजकुमार हे गाडीतून उतरून मुनीफ खलपे याला झायलो गाडीतून कॉलरला पकडून खाली उतरविले व शिवीगाळ करत एस राजकुमार याने मुनीफ खल्फे याच्या डोक्यात टॉमी मारून दुखापत केली. असे हवा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार म्हटले आहे. याबाबत दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.
ट्रकसमोर कार आडवी घालून चालकाला मारहाण ; गाड्यांची तोडफोड
