दुधाच्या टेम्पोलाही धडक दिल्याने तो टेम्पो चालकही जखमी
चिपळूण : मच्छीचे क्रेट नेत असलेला ट्रक हा मुंबई ते रत्नागिरी असा जात असताना तो मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील वळणावर आला असता ट्रकचे ब्रेक फेल झाले. यात हा ट्रक डीव्हायडरला जोरदार आदळून पलटी झाला. त्याच वेळी समोरून येणारा दुधाचा टेम्पो हा कोल्हापूर ते खेड असा जात असताना ट्रकची धडक बसल्याने यात टेम्पोवरील चालक विनोद माने याच्या हातास दुखापत झाली. तसेच मच्छीच्या ट्रकवरील चालक आकाश यादव याच्या डोक्याला दुखापत झाली. त्या दोघांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात नेण्यात आले. पलटी झालेल्या ट्रकमधील मच्छीने भरलेले कॅरेट सर्वत्र पडल्याने यावेळी महामार्गावर मच्छीचा खच पडला होता. या अपघातात महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. काहीवेळाने एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. काही तासांनी क्रेनच्या सहाय्याने रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.
परशुराम घाटात मच्छीचा ट्रक पलटी, गाडीचा चक्काचूर, चालक जखमी
