परस्पर विरोधी तक्रारी, 6 जणांवर गुन्हा, जखमींमध्ये रत्नागिरीतील दोघांचा समावेश
लांजा : तालुक्यातील सापुचेतळे येथे ऊस रस विक्रेता व भाजी विक्रेता यांच्यात जोरदार राडा झाला. या मारहाणीमध्ये एकूण चार जण जखमी झाले. याप्रकरणी दोन्ही बाजुकडून पुर्णगड पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी 6 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही घटना सोमवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली. आकाश रतन चव्हाण (28), विजय रतन चव्हाण (28, दोन्ही रा.मिरजोळे, रत्नागिरी) तसेच शिवाजी शंकर माने (32), दीपक शिवाजी माने (रा.पांडवनगर, नाचणे ) अशी जखमींची नावे आहेत. यातील आकाश रतन चव्हाण याने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांचा ऊसाचा रस विक्रीचा व्यवसाय असून गावोगावी भरणाऱ्या बाजारात ते जावुन ऊस विक्रीचा व्यवसाय करतात. 30 डिसेंबर रोजी शिवाजी माने व दीपक माने हे आकाशच्या बाजुला भाजी विक्रीसाठी बसले होते.
यावेळी ट्रे ची अडचण होत असल्याने ऊस रस विक्रेते आकाश यांनी तो ट्रे बाजुला सरकवला. याचा राग आल्याने शिवाजी माने व दीपक माने यांनी आकाश चव्हाण व विजय चव्हाण यांना मारहाण केली तर शिवाजी माने याने दाखल केलेल्या तक्रारीनुसार भाजीचा ट्रे ठेवल्याच्या रागातून आकाश चव्हाण व विजय चव्हाण यांनी बांबुने मारहाण केली अशी तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही बाजुकडील मारहाण करणाऱ्या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला. शिवाजी शंकर माने, दीपक शिवाजी माने व एक महिला तर दुसऱ्या बाजुकडील आकाश रतन चव्हाण, विजय रतन चव्हाण व अन्य एक महिला असे एकूण 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.