नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या सकाळी एलपीजी ग्राहकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरचे दर कमी केले आहेत. एलपीजी सिलिंडर आजपासून १४ रुपये ५० पैशांनी स्वस्त झाला आहे. सिलिंडरच्या दरात ही कपात संपूर्ण देशात लागू झाली आहे.मात्र एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरातील ही सवलत फक्त १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरसाठी असणार आहे. घरगुती गॅस सिलिंडर म्हणजेच १४ किलोच्या सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.
तेल विपणन कंपन्यांनी आजपासून १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. १ जानेवारी २०२५ पासून दिल्लीत १९ किलोच्या सिलेंडरची किंमत १८०४ रुपये, मुंबईत १७५६ रुपये, चेन्नईमध्ये १९६६ रुपये आणि कोलकातामध्ये १९११ रुपये असेल. त्यामुळे व्यावसायिक ग्राहकांना या दर कपातीचा मोठा फायदा होणार आहे.
मुंबईत एलपीजी सिलिंडरच्या दरात १६ रुपयांनी घट झाली आहे. मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलिंडर १७७१ रुपयांऐवजी १७५६ रुपयांना मिळेल. कोलकात्यात सिलिंडरची किंमत १९८०.५० रुपयांऐवजी ९६६ रुपये झाली आहे. तर पाटण्यात एलपीजी सिलिंडर २०७२.५ रुपयांऐवजी २०५७ रुपयांना मिळणार आहे.
१४.२ किलोच्या घरगुती सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत १ ऑगस्ट २०२३ रोजी शेवटची कमी झाली होती. दिल्लीमध्ये त्याची किंमत ८०३, कोलकातामध्ये ८२९, मुंबईमध्ये ८०२.५० आणि चेन्नईमध्ये ८१८.५० आहे. तर उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सिलिंडरच्या दरामध्ये सामान्य किमतीपेक्षा २०० रुपयांचा फरक आहे. याआधी सरकारने ऑगस्ट २०२३ मध्ये या सिलेंडरची किंमत सुमारे शंभर रुपयांनी कमी केली होती.