खेड / प्रतिनिधी:-मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील अवघड वळणावर अपघातांची मालिका सुरू आहे. मंगळवारीही सकाळच्या सुमारास मालवाहू ट्रक संरक्षक भिंतीवर आदळून झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाला. संरक्षक भिंतही कोसळल्याने अपघातांचा धोका वाढला असून वाहनालकांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे.
भोस्ते घाटातील अवघड वळणावर अवजड वाहतुकीच्या वाहनांना घडणारे अपघात रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून केलेल्या उपाययोजना फोल ठरल्या आहेत. वळणावर सतत घडणाऱ्या अपघातांमुळे संरक्षक भिंतीची नासधूस झाली आहे. मंगळवारीही गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट संरक्षक भिंतीवर जावून आदळला. हा ट्रक दरीत कोसळता कोसळता वाचला असला तरी संरक्षक भिंत मात्र कोसळली.
संरक्षक भिंत कोसळल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. जखमी चालकास उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे एका मार्गावरील वाहतूकही काहीकाळ ठप्प झाली. अपघाताचे वृत्त कळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमी चालकास मदतकार्य केले. अपघातग्रस्त ट्रक बाजूला हटवल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.