रत्नागिरी : मुंबई गोवा मार्गावर पाली नजीक नागलेवाडी येथे कंटेनर उलटून झालेल्या अपघातात चालक जखमी झाल़ा. ही घटना मंगळवारी सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास घडल़ी. जखमी झालेल्या चालकाला स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. तसेच पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे हलविण्यात आले. चालकाला या अपघातात गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती समोर येत आहे.
अपघातग्रस्त झालेला कंटेनर (एमएच 03 सीव्ही 5092) हा 31 रोजी गोव्याहून मुंबईच्या दिशेने चालला होत़ा. सकाळी तो पाली नागलेवाडी येथे आला असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यामुळे कंटेनर रस्त्यावरच उलटला. या अपघातात चालक हा कंटेनरच्या केबीनमध्ये अडकून पडला. त्याला स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले व पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच हातखंबा येथील महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच कंटेनरमुळे झालेली वाहतूक कोंडी देखील सोडविण्यात आली. अपघाताच्या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.