राजापूर:-मुंबई-गोवा महामार्गावरून राजापूर ते गुजरात दरम्यान खैरतोड करून नंतर त्या काताच्या अर्काची 240 ड्रम्स भरलेला ट्रक महाड-पोलादपूर दरम्यान वाहतूक पोलीस व एमआयडीसी पोलीसानी जप्त केला. ट्रकसह चालकास ताब्यात घेण्यात आले आहे.
महाड व पोलादपूर तालुक्यात खैराची वाहतूक करून सोलीव लाकडाची वाहतूक करण्यासाठी गावोगावी एजंट नेमुन खैरतस्कर चोरटी वाहतूक करत आहेत. ही वाहतूक करताना पोलिसांच्या डोळयात धूळ फेकण्याचांही प्रयत्न करत आहेत. नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर महामार्गावर वाहनांच्या वाढलेल्या गर्दीचा फायदा उठवत निळया रंगाचे ड्रम्स भरलेला ट्रक पोलादपूर तपासणी नाक्यावरून जाणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला.
महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजेवाडी, भोर आणि सावित्री पुलाजवळ पोलिसांनी वाहनाची तपासणी करण्यास सुरुवात केली. पोलीस हवालदार तेजस कदम व नारायण शिर्के यांनी टाटा कंपनीचा ट्रक अडवल्यानंतर एका ट्रकमध्ये 240 निळे ड्रम्स संशयास्पद वाटले. ही बाब वनक्षेत्रपाल राकेश साहू यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर महाड एमआयडीसी पोलीस निरीक्षक जीवन माने व राकेश साहू यांनी घटनास्थळी पोहून 240 ड्रम्ससह चालकास ताब्यात घेतले. या कारवाईने खैर वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.