लांजा : नासा इस्त्रो परीक्षेमध्ये लांजा जि.प.पू.प्रा.शाळा क्र.५ ने सुयश संपादन केले असून अंश मसणे, ज्ञानेश्वरी शिंदे आणि शौर्य जाधव या शाळेच्या तीन विद्यार्थ्यांची तालुका स्तरावर निवड झाली आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या जाणू विज्ञान अनुभव विज्ञान या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांची केंद्रस्तरावर नासा इस्त्रो भेट चाचणी परीक्षा घेण्यात आली. केंद्रस्तरावर लांजा शाळा क्र.५ चे २८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते तर नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरावरील निवड चाचणी स्पर्धेत लांजा क्र.५ च्या तीन विद्यार्थ्यांची तालुकास्तरावर निवड झाली आहे. यामध्ये अंश दिनेश मसणे याने द्वितीय क्रमांक, ज्ञानेश्वरी प्रसन्न शिंदे हिने तृतीय क्रमांक आणि शौर्य अमित जाधव याने आठवा क्रमांक मिळवून जिल्हास्तर परीक्षेसाठी त्यांची लांजा तालुक्यातील निवड झाली आहे. एकाच शाळेतील दहा पैकी तीन विद्यार्थ्यांची निवड हा इतिहास घडला असून सलग तीन वर्षे शाळेची यशाची परंपरा अखंडित राहिली आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेच्या पदवीधर शिक्षिका माणिक मंगेश कदम यांचे मार्गदर्शन लाभले. तर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग, केंद्रीय प्रमुख चंद्रकांत पावसकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.विमल चव्हाण, शाळेतील सर्व शिक्षक वृंद आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गुंडोपंत तथा भाई चौगुले तसेच सदस्य यांचे सहकार्य लाभले.
नासा इस्त्रो निवड चाचणी परीक्षेत तीन विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशा बद्दल लांजा नं.५ चे विद्यार्थी व शिक्षक यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.