रत्नागिरी : पश्चिम बंगाल येथून औषध विक्रीसाठी आलेल्या १० ते १२ नागरिक रत्नागिरी शहरात दाखल झाले आहेत. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याबाबत संशय व्यक्त करीत त्यांना शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यांची कागदपत्र तपासण्यात येत असून ते थेट रत्नागिरीत कसे आले, याची चौकशी सुरू आहे.
गेल्या काही दिवासांपासून बांग्लादेशीय, रोहिंगे आदींचे जिल्ह्यात बेकायदेशीर वास्तव असल्याचे पुढे आले आहे. पोलिस अशा बेकायेदशीर वास्तव्यास असलेल्यांचा शोध घेत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी देखील या मोहिमेत उतरले आहेत. त्यांनी राजिवड्यात राहणाऱ्या काही संशयास्पद व्यक्तींची माहिती पोलिसांना दिली आहे. त्याची चौकशी सुरू असताना आज शहरामध्ये सुमारे १० ते १२ व्यक्ती पश्चित बंगालमधून आल्या आहेत. या व्यक्तींकडे सांधेदुखीवरील जालीम औषधाची बाटली असल्याच त्यांचा दावा आहे. तसेच माशाच्या मणक्याचे हाड व एक वनस्पती असलेला दोरा हे लोक देत आहेत. त्यांच्यामुळे आपल्या रक्तवाहिन्या चांगल्या होतात, अनेक व्याधी कमी येतात असा त्याचा दावा आहे. शहरातील जयस्तंभ येथे या संशयास्पद व्यक्ती उतल्यानंतर मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांना हटकले. त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना संशय आला म्हणून त्यांनी शहर पोलिसांच्या स्वाधिन केले आहे. पोलिस या संशयितांची चौकशी करत आहे. त्यांच्या कागदपत्रांची उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.