पावसमधील चार किनाऱ्यावर वाहने नेण्यास मज्जाव
पावस : नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला समुद्रकिनारी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पावस परिसरातील हॉटेल व्यावसायिकांना सक्त सूचना देण्यात आल्या असून, समुद्रकिनारी जाणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे.
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पावस परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, अनेक हॉटेल नववर्षासाठी सज्ज झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर परिसरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पूर्णगड पोलिस ठाण्यात पोलिसपाटील व पोलिस अंमलदार यांची बैठक घेण्यात आली. पूर्णगड, गावखडी, रनपार, वायंगणी आदी परिसरात समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटक जाऊन मौजमजा करतात.
या दरम्यान अनेकजण आपली वाहने समुद्रामध्ये नेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे वाळूमध्ये वाहने रूतण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे समुद्रकिनारी जाण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दृष्टीने समुद्राकडे जाणाऱ्या वाहनांसाठी अडथळे टाकण्यात आले आहेत जेणेकरून आनंद साजरा करताना वाहने किनाऱ्यावर नेली जाऊ नयेत तसेच परिसरातील सर्व पोलिसपाटील, अंमलदारांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.