चिपळूण : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेला अवमान, परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीची झालेली विटंबना आणि सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कस्टडीमध्ये झालेला मृत्यू या घटनांचा जाहीर निषेध करण्याबरोबर विविध मागण्यासंदर्भात सोमवारी चिपळूण तालुका बौध्द समाज संघटनेने काढलेल्या विराट मोर्चाने चिपळूण दणाणून गेले. यावेळी संघटनांनी आपल्या मागण्यासंदर्भातील निवेदन प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांना दिले.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळयास अभिवादन करुन ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, जय भीम, संविधानाचा अवमान करणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे’ यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करुन या मोर्चास सुरुवात झाली. तेथून हा मोर्चा पुढे काविळतळी, मार्कंडी व त्यानंतर सांस्कृतिक केंद्र परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास अभिवादन करुन पुढे चिंचनाका, भोगाळे, पॉवर हाऊस मार्गे येथून प्रांत कार्यालयावर येवून धडकला.
यावेळी परभणी येथे संविधानाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकाला फाशीची शिक्षा द्या, तसेच मास्टरमाईद असणाऱ्याचा शोध घेऊन त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल व्हावा, संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणारे अमित शहा यांची केंद्रीय गृहमंत्री पदावरुन हकालपट्टी करावी, परभणी येथे आंबेडकरी अनुयायांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत, सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी, तसेच या घटनेप्रकरणी सखोल चौकशी करुन संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करावेत आदी सात प्रमुख मागण्या असलेले निवेदन प्रांताधिकारी लिगाडे यांना देण्यात आले.