माखजन : संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड येथील ग्रामपंचायत सदस्य संदीप कवळकर यांच्या घराशेजारील विद्युत खांब सध्या धोकादायक स्थितीत आहे. या विद्युत खांबाला भगदाड पडले असून जेमतेम तारांमुळे हा उभा राहिला आहे.
तारांना आधार देण्याऐवजी, खांब तारांच्या आधारामुळेच उभा असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
मोठा वारा आल्यास हा खांब केव्हाही जमीनदोस्त होऊ शकतो, अशी धोकादायक स्थिती असताना महावितरण याकडे दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
ग्रामपंचायत सदस्य संदीप कवळकर यांनी सतत महावितरणच्या ही बाब निदर्शनास आणून देखील महावितरणने अद्याप दखल घेतली नसल्याचे कवळकर यांनी सांगितले. सदर विद्युत खांब पडल्यास बाजूला घरे आहेत. शिवाय खांबा शेजारी मोठ्या प्रमाणात वाळलेले गवत आहे.
खांबासोबत विद्युत भारित तारा जमिनीवर कोसळल्या तर भीषण आग लागू शकते अशी स्थिती आहे. या विद्युत खांबा शेजारी राहणार्या रहिवाशांना जीव मुठीत घेऊन रहावे लागत आहे. हा धोकादायक विद्युत खांब महावितरण विभागाने तत्काळ बदलावा, अशी मागणी होत आहे.