रत्नागिरी:-भारतीय जनता पार्टीच्या सभासद नोंदणी अभियानाला रत्नागिरीत प्रारंभ झाला. शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधून जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली.
जिल्ह्यामध्ये भाजपाचे माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली होती. आता जिल्हाध्यक्ष सावंत यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात सर्व मंडल स्तरावर, बूथ स्तरावर सभासद नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे. सभासद नोंदणी अभियानाचे प्रमुख म्हणून जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे काम पाहत आहेत.
प्रभाग क्रमांक ६ मध्ये अभ्युदयनगर येथून शहर सभासद नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली. प्रभाग क्रमांक सहामधील भाजपा कार्यकर्ते नीलेश आखाडे यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्रमांक सहासाठी तयार केलेल्या दिनदर्शिकेचेदेखील प्रकाशन करण्यात आले.
शहराध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व प्रभागांमध्ये सभासद नोंदणी अभियान राबवले जाणार आहे. रत्नागिरी शहरामध्ये या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे जिल्हाध्यक्ष सावंत यांनी सांगितले.