संगमेश्वर:-देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्व. अरुंधती अरुण पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक ‘आर्ट अँड क्राफ्ट एक्झिबिशन’ भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाला विद्यार्थी, पालक आणि कलाप्रेमी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कलाशिक्षक सुरज मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध चित्र व इतर कलाकृती या प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. बाल कलाकारांच्या या चित्रकृती पाहताना मोठ्या कलाकाराइतक्याच प्रगल्भ कलाकृती सादर केल्याची अनुभूती या प्रदर्शनाद्वारे प्रेक्षकांनी अनुभवली.
प्रदर्शनामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये वर्षभरात काढलेली विविध प्रकारची चित्रं व इतर कलाकृती मांडण्यात आल्या होत्या. यामध्ये निसर्ग चित्र, व्यक्ती चित्र(पोट्रेट), संकल्प चित्र, कोलाज, व्यंगचित्र, भीत्तीचित्र, विविध डिझाइन्स, सुलेखन (कॅलिग्राफी) इत्यादीचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी वॉटर कलर, अॅक्रेलिक कलर, ऑइल कलर, ऑइल पेस्टल, रंगीत पेन्सिल व पेन, चारकोल इत्यादी माध्यमांचा सुयोग्य वापर केला होता. इयत्ता ५वी ते १०वी पर्यंतच्या वयोगटातील मुलांनी ही चित्र रेखाटली होती .या चित्रांमध्ये मुलांनी विविध विषय हाताळले होते. यातून मुलाची मेहनत, प्रगल्भता, बुद्धिमत्ता आणि प्रतिभा दिसत असल्याची प्रतिक्रिया अनेक प्रेक्षकांनी व्यक्त केली.
प्रदर्शनस्थळी शिक्षिका भक्ति मांगले यांनी रेखाटलेली भली मोठी आकर्षक रांगोळी लक्षवेधी ठरत होती. प्रशालेतील श्रिया अणेराव(९ वी), ग्रीष्मा गोवरे(९ वी), सार्थक जाधव(९ वी), गार्गी शिंदे(९ वी), गुंजन सार्दळ(९वी), वेदा दांडेकर(९वी), दुर्वा खेतल(९वी), दिया खामकर(८वी), सानवी भुरवणे (८वी), गार्गी खांबे (६वी), आर्या खेतल(६वी), आर्यन सावंत(६वी), पियुष जागुष्टे(६वी), प्रसन्न साळवी(५वी) यांच्या अनेक चित्रकृती अनुभवी कलाकारांच्या तोडीतोड असल्याचे प्रदर्शन पाहताना जाणवत होते. चित्रकृतींचा नियमित अभिनव उपक्रम राबवून मुलांच्या कलागुणांना कलाशिक्षक सुरज मोहिते प्रोत्साहित करतात, अशा प्रकारचा स्तुत्य उपक्रम प्रशालेने राबविल्याबद्दल प्रदर्शनास भेट देणाऱ्या अनेक पालकांनी कलाशिक्षक सुरज मोहिते, शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली नारकर व दीक्षा खंडागळे यांचे अभिनंदन केले.
या कला प्रदर्शनाचे उद्घाटन प्रशालेच्या चेअरमन ॲड. वेदा प्रभुदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सुधीर गावडे, नितीन शेडगे, पल्लवी आपटे यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक तसेच बहुसंख्या विद्यार्थी आणि मार्गदर्शक कलाशिक्षक सूरज मोहिते उपस्थित होते. प्रदर्शनाच्या उत्तम आयोजनासाठी कलाशिक्षक व सहभागी विद्यार्थी कलाकारांचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.