रत्नागिरी:- लोकसहभागातून बंधारा बांधण्याचे कार्य सातत्याने करणे प्रेरणादायी आहे. असेच काम गावोगावी व्हायला पाहिजे, असे मत जनसेवा मंडळाचे अध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्य ॲड.अविनाश काळे यांनी व्यक्त केले.
अनुलोम प्रेरित जनसेवा मंडळातर्फे लोकसहभागातून आज सकाळी गोळप मोरवठार आणि पवारवाडीच्या खाली नदीवर पुलाजवळ ५० फूट कच्चा बंधारा बांधण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, गेली अनेक वर्षे अनुलोम प्रेरित जनसेवा सामाजिक मंडळाच्या वतीने गोळप परिसरात लोकसहभागातून पाण्याची बचत व्हावी, पाणीटंचाई दूर व्हावी, पाण्याचा साठा वाढावा, वाहत जाणारे अब्जावधी लिटर पाणी अडवावे, पाण्यातून समृद्धी यावी बंधारा बांधला जात आहे. अशा छोट्या छोट्या बंधाऱ्यांतून पाणी साठविल्याने जमिनीत ओलावा टिकून राहतो. आजूबाजूला पाणी जिरते. यामुळे विहिरींना पाणी वाढून पाणीटंचाई दूर होण्यास मदत होते.
यावर्षी बांधलेला हा तिसरा बंधारा आहे. यासाठी लागणाऱ्या पिशव्या फिनोलेक्स कंपनीकडून उपलब्ध करून दिल्या आहेत.