आळंदी येथे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे आठवे पर्यावरण संमेलन
चिपळूण:- सातशे वर्षापूर्वी ‘पर्यावरण’ या विषयाकडे आपले संत सूक्ष्मपणे पाहत होते. संत ज्ञानेश्वरांनी, एका ठिकाणी ‘नरगेचि रचावी, जळाशये निर्मावी महावने लावावी, नानाविधे।‘ असे म्हटलेले आहे. यातील ‘नानाविध’ हा शब्द माऊलीनी पर्यावरणाचा विचार करता अतिशय सूचक वापरला आहे. एकाच प्रकारच्या झाडांच्या बागा लावल्या आणि ती झाडे संभाव्य रोगाला प्रतिकार करणारी नसली तर ती सर्वच्या सर्व कीडग्रस्त होतात. वेगवगळ्या प्रकारच्या झाडांमधील अशी प्रतिकार शक्ती ही वेगवेगळी असते. तेंव्हा कीड किंवा रोग पडला तरी सगळी झाडे नष्ट पाहू नयेत, या मागील माऊलीच्या दृष्टीकोन संभवतो. कोणत्याही सामाजिक क्षेत्रात वावरण्यासाठी मनुष्यामध्ये एक विशिष्ठ स्वभाव असावा लागतो. सध्याच्या जगासमोरील पर्यावरणीय संकट दूर सारण्यासाठी पर्यावरण जनजागरण-संवर्धन वर्तन हाही मानवी स्वभाव आणि संस्कार बनायला हवा आहे असे मत लेखक-पत्रकार आणि पर्यावरण-पर्यटन क्षेत्रातील कार्यकर्ते धीरज वाटेकर यांनी व्यक्त केले.
भारतीय वनस्पतींचा चालताबोलता माहितीकोश अशी ओळख असलेले ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ प्रा. श्री. द. महाजन यांच्या अध्यक्षतेखाली निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ (एन.जी.ओ.) आयोजित आठवे पर्यावरण संमेलन नुकतेच संपन्न झाले. यावेळी वाटेकर बोलत होते. संमेलनाध्यक्ष प्रा. महाजन (वय ९३ वर्षे) यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे उपस्थितांशी संवाद साधला. आयोजक संस्था ही प्रमुख ‘पद्मभूषण’ अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. आळंदीतील देविदास धर्मशाळा तथा वै. मामासाहेब दांडेकर स्मृती मंदिर येथे संपन्न झालेल्या एकदिवसीय (रविवार २९ डिसेंबर) संमेलनप्रसंगी व्यासपीठावर संमेलनाचे उद्घाटन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी (देवाची)चे प्रमुख विश्वस्त अॅड. राजेंद्र बाबुराव उमाप, नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे पर्यावरण सल्लागार आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ (नि.) डॉ. प्रमोद मोघे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी आरोग्य अधिकारी अॅड. प्रभाकर तावरे, देविदास धर्मशाळेचे अध्यक्ष ह.भ.प. निरंजनशास्त्री कोठेकर, मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रमोद मोरे होते.
वाटेकर पुढे म्हणाले, माऊलींच्या पर्यावरणीय चिंतनाला पारमार्थिक तत्त्वज्ञानाची बैठक आहे. पर्यावरणीय समस्या तेव्हा नव्हत्या, आज प्रचंड आहेत. म्हणून पर्यावरण संवर्धन वर्तन हा मानवी स्वभाव-संस्कार बनण्याची गरज आहे. हाच विचार करून अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘वृक्षमित्र’ स्व. आबासाहेब मोरे यांनी १९८२ साली पर्यावरण जनजागरणाचं काम सुरु केलं होतं. आजचं पर्यावरण संमेलन हे त्याचंच रूप आहे. खरंतर निसर्गाचं स्वयंव्यवस्थापन हे व्यवस्थापनशास्त्राचं सर्वोत्तम उदाहरण आहे. मनुष्याच्या लुडबुडीमुळे पर्यावरणाचं व्यवस्थापन बिघडलं आहे. माणसांनी पर्यावरणाच्या शिस्तबद्ध चाकोरीमध्ये लुडबुड करून निर्माण केलेल्या अडथळ्यांची दुरुस्ती करायला हवी आहे. ही दुरुस्ती करण्याचे काम अनेक मंडळी आपल्यापरीने करत आहेत. अशा तज्ज्ञांचे विचार उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यात एक व्यवस्था उभी करायला हवी याची जाणीव सुमारे ३० वर्षांपूर्वी आबासाहेबांना झाली होती. त्यातून मंडळाचे काम उभे राहिल्याचे वाटेकर यांनी सांगितले. संत ज्ञानेश्वरांनी वृक्षाला स्थितप्रज्ञ म्हणून गौरविले आहे. सर्वांभूती समदृष्टी ठेवणारी व्यक्ती आणि वृक्ष एक समान आहेत असे त्यांनी म्हटले आहे. ‘जो या खांडवया घावो घाली का लावणी जायचे केले दोघन एकीच साऊली वृक्षू दे जैसा. वृक्ष जो त्याला तोडण्याच्या हेतूने त्याच्यावर घाव घालतो आणि जो पाणी घालून त्याला वाढवतो त्या दोघाना समान सावली देतो. मित्र आणि शत्रू असा भेदभाव न करता सर्वाविषयी समभाव ठेवणे हे वृक्षाचे लक्षण आहे. तसेच ते स्थितप्रज्ञ व्यक्तीचे अर्थात संताचे लक्षण आहे. ज्ञानेश्वरीत विविध वृक्षांची नावे, पशुपक्ष्यांची नावे, धातूंची नावे प्रसंगपरत्वे ज्ञानेश्वरांनी दृष्टांत, रूपक, उपमा यांच्याद्वारे समर्पकपणे उल्लेखले आहेत. अरण्यांना ‘निकुंज’ म्हटले आहे. ज्ञानेश्वरीत निसर्ग, पर्यावरण हे शब्द आढळत नाही. त्यांनी ‘जीवसृष्टी’ आणि ‘भूतसृष्टी’ ह्या संकल्पनांचा उपयोग पर्यावरण अर्थी घेतलेला आहे. निसर्गातील विविध घटकांचे दाखले दिले आहेत, असे वाटेकर म्हणाले.
आज समाजात काम करणारे हात कमी आहेत. म्हणून पर्यावरण विषयात काहीतरी करू पाहणाऱ्या हातांना प्रोत्साहन द्यायला हवं. ही मंडळाची भूमिका आहे. आपलं काम हे जाणीव जागृतीचं काम आहे. कार्य करत राहाणे आवश्यक आहे. यातून आदर्श स्थिती आणि वस्तुस्थिती यातलं अंतर कमी करता येईल. आळंदीतील पर्यावरण संमेलनाला रत्नागिरी जिल्ह्यातून राज्य उपाध्यक्ष विलास महाडिक, जिल्हाध्यक्ष सतीश मुणगेकर, संतोष सुर्वे, गजानन बाड, ओंकार शिपटे, सौ. मायावती शिपटे, श्रुतिका आखाडे, शैलेजा आखाडे यांच्यासह राज्याच्या पुणे, अहिल्यानगर, नाशिक, सोलापूर, ठाणे, सातारा, जळगाव, सांगली, यवतमाळ, रायगड, छत्रपती संभाजीनगर, बीड, नंदुरबार, धुळे, लातूर, मुंबई, नांदेड, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, हिंगोली, वाशिम, गोंदिया, नागपूर, कोल्हापूर, धाराशिव आदी २१ जिल्ह्यातील २०० पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.