तुषार पाचलकर / राजापूर
राजापूर जनजागृती समिती व खादी ग्रामोद्योग, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने राजापूर शहरातील जयप्रकाश नार्वेकर यांच्या निवासस्थानी सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींसाठी आयोजित मेळाव्याला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. या मेळाव्यामध्ये सुमारे 35 लाभार्थी सहभागी झाले होते, यापैकी सुमारे 15 लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर करण्यात आली.
या मेळाव्याला खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अमित इंदुलकर तसेच राजापूर युनियनचे व्यवस्थापक अनिल कुबटकर, स्टेट बँक राजापूरचे उपव्यवस्थापक अमित शिंदे यांनी उपस्थित राहून युवक-युवतींना मार्गदर्शन केले. यावेळी राजापूर अर्बन बँकेचे माजी व्यवस्थापक प्रसन्न मालपेकर व महिला पतपेढीच्या माजी चेअरमन सौ.माधवी हर्डीकर यांनी नॅशनल बँकांच्या धोरणात कागदपत्रात निटनेटकेपणा आणून कर्ज व्यवहारात सुलभता आणावी असे सांगितले.
तसेच माजी नगराध्यक्ष व राजापूर अर्बन बँकेचे माजी चेअरमन जयप्रकाश नार्वेकर यांनी राजापूर शहर व तालुक्यातील बेरोजगार युवक, युवतींनी शासकीय नोकऱया नसल्यामुळे कष्ट करून स्वतचा व्यवसाय सुरू करावा तसच आपल्या अंगभूम ग्रामीण व्यवसायाला अनुसरून नाविण्यपूर्ण व्यवसाय निवडून स्वतच्या पायावर उभे रहावे, जिल्हयाचे पालकमंत्री, खासदार, आमदार याकामी आपल्याला सहकार्य करतील असा आशावादही व्यक्त केला.
या मेळाव्यामध्ये शहरातील 10 तर तालुक्यातील 15 लाभार्थ्यांनी सहभाग घेतला. यापैकी दहा कर्जदार हे 60 वर्षे वयावरील असल्याने निकषात बसू शकले नाहीत. तर 15 लाभार्थ्यांच्या कर्जप्रकरणांना थेट मंजुरी देण्यात आली. यावेळी जेष्ट नागरिक प्रतिभा मराठे, प्रकाश ढवळे, नित्यानंद पाटील, अरविंद लांजेकर आदींसह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. मार्चपूर्वी मातोश्री सभागृहात असाच मेळावा घेण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले. नार्वेकर यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.