लांजा : नारळाच्या उंच माडावरून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या त्या नेपाळी गुरख्याचा अखेर कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे.
राजापूर तालुक्यातील दसुर येथील काझी नामक व्यक्तीकडे गोविंद थापा नावाचा नेपाळी गुरखा बागेत कामाला होता. तो १६ डिसेंबर रोजी साटवली येथील दूध डेअरीवर दूध घालण्यासाठी आला होता. यावेळी साटवली भंडारवाडी येथील एका व्यक्तीने त्याला नारळाच्या माडावर नारळ काढण्यासाठी चढवले होते. त्यावेळी तोल जाऊन उंच झाडावरून खाली पडल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने प्रथम लांजा आणि त्यानंतर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र या ठिकाणी त्याची प्रकृती अधिकच गंभीर बनल्याने त्याला कोल्हापुर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, त्या ठिकाणी उपचार सुरू असताना अखेर त्या नेपाळी गुरख्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी साटवली आंबा व्यापारी वर्गातून केली जात आहे.