क्यूआर कोड वाचनालयचे केले अनावरण
संगमेश्वर/शांताराम गुडेकर:- तालुक्यात तहसीलदार कार्यालयांतर्गत दि. १९ डिसेंबर २०२४ ते २४ डिसेंबर २०२४ या कालावधीत सुशासन सप्ताहाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.या कालावधीत तहसीलदार कार्यालयामार्फत तसेच मंडळ अधिकारी कार्यालयामार्फत देवरुख, हातीव, ताम्हाने, ते-र्ये, मुचरी, माखजन, धामापूर तर्फे संगमेश्वर, आरवली, तुरळ, फणसवणे, कळंबस्ते, लोवले, माभळे, आंगवली, बामणोली, देवळे, दाभोळे, गावामध्ये महसूल विभागामार्फत राबविण्यात येणा-या विविध योजनाबाबतची माहीती सांगण्यात आली.
याबरोबरच विविध दाखले वितरण करण्यात आले. खातेदारांना त्यांचे सातबारा आठ अ, फेरफार वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे विविध योजनांचे १७ अर्ज स्वीकारण्यात आले. तसेच कोंडगाव, साखरपा, कडवई, चिखली, कोंडकदमराव, तुळसणी, डिंगणी व फुणगूस या गावामध्ये कार्यक्रम आयोजीत आहेत.श्रीमती अमृता साबळे, तहसीलदार संगमेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली देवरुख महसूल मंडळामार्फत दि. २४ डिसेंबर २०२४ रोजी क्यूआर कोड वाचनालय अनावरण करण्यात आले. क्यूआर कोडच्या माध्यमातून विविध पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करुन देण्यात आली. या माध्यमातून महसूल विभागाच्या दैनंदिन कामकाजामधील माहीतीची “रचना व कार्य, ऑनलाईन सातबारा, तलाठी कामकाज मार्गदर्शिका, गोष्टीतून फेरफार शिकूया, जनमाहीती अधिकारी, महसूल न्यायालय, जाणून घ्या महसूल संलग्न कायदे, वारस नोंदी, महसूल प्रश्नोत्तरे, १०१ महसूल लेख” अशी बहुमुल्य मार्गदर्शक पूस्तके वाचनासाठी उपलब्ध करुन देण्यात आली.
त्याचप्रमाणे लोकाभिमूख डिजीटल सेवांच्या वेबसाईटच्या लिंक क्यूआर कोडमार्फत तात्काळ उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यामाध्यमातून “डिजीटल सातबारा, ई पिक पहाणी, आपली चावडी, महा भू नकाशा तसेच ई हक्क प्रणाली” अशा लिंक तात्काळ उपलब्ध होण्यास खुपच मदत झाली आहे.या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी तहसीलदार श्रीमती अमृता साबळे, नायब तहसीलदार सुदेश गोताड, मंडळ अधिकारी रोहीत पाठक व त्यांचे सहकारी ग्राम महसूल अधिकारी रोहीत वाकचौरे, दिगंबर चौधर, श्रीमती जयश्री पाटील, द्वारकेश तायडे यांचे नागरीकांमधून अभिनंदन करण्यात येत आहे.