मुंबई : राज्यात महायुती सरकारचे खाते वाटप झाल्यानंतर मंत्र्यांनी पदभार स्वीकारला आहे. महायुती सरकारच्या आगामी धोरण-निर्णयांबाबत मंत्र्यांनी आता आपल्या खात्यांच्या अधिकाऱ्यांबाबत चर्चा करण्यास सुरुवात केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी, वित्त व नियोजनसह राज्य उत्पादन शुल्क खात्याची सूत्रे हाती घेतली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी विविध मुद्यांवर चर्चा करत प्रस्ताव सादर केल्याची माहिती आहे. अधिकाऱ्यांच्या या प्रस्तावामुळे लाडक्या बहिणींचा ताप वाढणार असल्याचे म्हटले जात आहे.
अजित पवारांसमोर अधिकाऱ्यांचा प्रस्ताव…
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुत्रे हाती घेताच मंगळवारी मंत्रालयात दोन्ही विभागांसह शासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वित्त, नियोजन आणि उत्पादनशुल्क विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. करसंकलन आणि महसुलवाढीच्या प्रक्रियेत सुसुत्रता, सुधारणा आणत ‘रिझल्ट ओरियंटेड’ काम करण्याचे निर्देश त्यांनी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. अधिकाऱ्यांनी पारदर्शक कारभार करावा. करचोरी, करगळती रोखण्याच्या कर्तव्यात हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
अधिकाऱ्यांच्या प्रस्तावाने लाडक्या बहिणींचा वाढणार ताप…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर अधिकाऱ्यांनी उत्पन्न वाढीसाठी काही प्रस्ताव सादर केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यात लाडकी बहीण योजनेसह विविध योजना सुरू आहेत. या योजनांच्या आर्थिक तरतुदीमुळे तिजोरीवर मोठा भार येत आहे. त्यामुळे आता सरकारने महसूल वाढीसाठी मद्यविक्रीसाठी नवीन परवाने सुरू करावे असा प्रस्ताव अधिकाऱ्यांनी दिला असल्याचे म्हटले जात आहे. बीअर शॉपमध्ये वाईन, मद्य विक्रीला परवानगी द्यावी असा प्रस्तावही सादर करण्यात आल्याची माहिती आहे. लाडकी बहीण आणि इतर योजनांमुळे राज्याची आर्थिक तूट दोन लाख कोटींपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारकडून आता तूट कमी करण्यासाठी विविध उपाय आखण्यास सुरुवात झाली आहे. मद्य विक्रीच्या दुकानात वाढ झाल्यास तळीरामांना याचा फायदा होईल. पण, त्यांच्या व्यसनाने घरातील महिलांना त्रास सहन करावा लागणार आहे.