मुंबई : सगळ्यात स्वस्त मोबाइल सेवा देणारी सरकारी कंपनी बीएसएनएल लवकरच ५जी सेवा सुरू करणार असून त्यामुळे या कंपनीची सेवा घेण्याकडे युजर्सचा कल वाढू लागला आहे. खासगी कंपन्यांचे महाग होत असलेले मोबाइल रिचार्ज परवडत नसल्याने काही लोक बीएसएनएलकडे वळू लागले आहेत.
तीन प्रमुख कंपन्यांनी १.०८ कोटी ग्राहक गमावले आहेत. युजर्स आणखी कमी होऊ नये म्हणून मोबाइल सेवांचे दर कमी करण्यावर येत्या काळात एअरटेल, जिओ, व्होडाफोन आयडिया या कंपन्यांचा भर असू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
बीएसएनएलचे चांगले नेटवर्क आणि ५जी सेवा सुरू झाली तर या कंपनीची स्वस्तातील मोबाइल सेवा घेणाऱ्या लोकांची संख्या वाढू शकते. त्यामुळे एअरटेल, जिओ, व्होडाफोन, आयडिया या कंपन्यांना फटका बसू शकतो.
१.३३ कोटी युजर्सनी सप्टेंबर महिन्यात मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीसाठी (एमएनपी) अर्ज केला होता. वाढत्या दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये नाराजी असून, स्वस्त सेवा देत असलेल्या कंपन्यांकडे ग्राहक वळू लागल्याचे यातून दिसते.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार गेल्या दोन तिमाही मध्ये एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन, आयडियाचे युजर्स घटू लागले आहेत. त्या तुलनेत स्वस्त असल्याने बीएसएनएलकडे लोकांचा ओढा वाढला. मात्र सध्या ही संख्या कमी आहे.
लोक बीएसएनएलकडे वळू लागले…
लवकरच बीएसएनएलची ५जी सेवा सुरू करू. त्यासाठी चाचण्या सुरू असल्याचे दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नुकतेच सांगितले आहे. शिवाय ४जी सेवा बळकट करण्यासाठी टॉवर वाढवण्यावर आणि आणखी चांगले तंत्रज्ञान वापरण्यावर लक्ष केंद्रित केले असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यामुळे बीएसएनएल वापर- णाऱ्यांना इंटरनेटचा चांगला स्पीड मिळू शकेल. बीएसएनएलच्या सध्याच्या ग्राहक संख्येत सप्टेंबरमध्ये ८.४९ लाख युजर्सची भर पडली आहे. त्यांचा बाजारातील हिस्सा ७.९८ टक्के असून, येत्या काळात तो वाढू शकतो.
सेवा स्वस्त का होईल?
बीएसएनएलची सेवा स्वस्त आहे. दरवाढ करण्याचा कोणताही विचार नसल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. तुलनेत खासगी कंपन्यांचे दर अधिक आहेत. स्वस्तातील रिचार्ज मिळावा यासाठी बीएसएनएलकडे लोकांचा ओढा वाढल्यास, खासगी कंपन्यांना दरकपात करावी लागेल.