बीड : केज तालुक्यातील मस्साजोग सरपंच हत्येला मंगळवारी १६ दिवस झाले; परंतु अजूनही मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे तिघे जण मोकाटच आहेत. त्यामुळे बीड पोलिस आणि सीआयडीच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले जात असून कुटुंबासह सामान्यांमधून पोलिसांबद्दल रोष व्यक्त होत आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या केल्याची घटना ९ डिसेंबर रोजी घडली होती. या प्रकरणात आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली असून ते सध्या पोलिस कोठडीत आहेत, तर सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे प्रमुख आरोपी अद्याप फरारच आहेत.
बीडमध्ये कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कोणत्याही आरोपीला सोडणार नाही. बीडमध्ये कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी स्पष्ट केले. बीडचे पालकमंत्रिपद मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी स्वीकारावे, अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे. यावर ते म्हणाले, आम्ही तिन्ही पक्षांचे नेते त्यावर योग्य निर्णय घेऊ.
खंडणीच्या गुन्ह्यातही तपास संथ
पवनचक्की उभारण्याचे काम करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्याला दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. या प्रकरणात वाल्मीक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे हे आरोपी आहेत.
यात चाटेला अटक केली आहे; परंतु या प्रकरणाच्या तपासातही फारशी गती नाही. पोलिस कोठडीत त्याच्याकडून काय माहिती मिळाली? हे अद्यापही माध्यमांसमोर पोलिसांनी मांडले नाही. त्यामुळे या तपासावरही प्रश्न उपस्थित केले जात आहे.
मागील वेळी पालकमंत्री, मंत्रिपद भाड्याने दिले : धस
मागील पालकमंत्री आणि मंत्रिपद 3 भाड्याने देण्यात आले होते, असा खळबळजनक आरोप भाजपचे आष्टीचे आ. सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता केला. मंत्रिपद भाड्याने दिल्याचे मी नव्हे, तर पंकजा मुंडे यांनीच तेव्हा भगवान भक्ती गडावरून असे भाष्य केले होते. मी तर आता म्हणालो आहे, असे म्हणत पंकजा यांच्या वक्तव्याचीही आठवण करून दिली.
मंगळवारी आष्टीत माध्यमांशी संवाद साधताना आ. धस म्हणाले, विष्णू चाटे हा छोटा आका होता; परंतु मोठा आका याचादेखील हत्या प्रकरणात सहभाग आहे. तोच मुख्य सूत्रधार आहे. त्यामुळे त्यालादेखील आत लवकर आत टाकले पाहिजे, असे आ. धस म्हणाले. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सर्व घटनाक्रम आ. धस यांनी अधिवेशनात सांगितला होता