एमएमआरडीएकडून सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू
मुंबई : मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या महानगरांमध्ये देशभरातून येणाऱ्या लोढ्यांमुळे पायाभूत सुविधांवरील ताण कमी करण्यासाठी आता तिसरी मुंबई वसवण्यात येणार आहे.
अटल सेतू प्रभाव क्षेत्रातील उरण, पेण आणि पनवेल तालुक्यातील १२४ गावांमध्ये ही तिसरी मुंबई उभी राहणार आहे.त्याचा मास्टर प्लॅन बनविण्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरू केली आहे. ऑगस्ट २०२६ पर्यंत या भागाचा सर्वसमावेश मास्टर प्लॅन आणि सविस्तर विकास धोरण तयार होईल.
अटल सेतू आणि नवी मुंबई विमानतळ प्रभाव क्षेत्रातील गावांच्या विकासासाठी एमएमआरडीएची नवे नगर विकास प्राधिकरण म्हणून राज्य सरकारने नियुक्ती केली आहे. यामध्ये नवी मुंबई विमानतळ अधिसूचित क्षेत्रातील ८० गावे, खोपटा नवनगर अधिसूचित क्षेत्रातील ३३ गावे, मुंबई महानगर प्रादेशिक योजना क्षेत्रातील दोन गावे आणि रायगड प्रादेशिक योजना क्षेत्रातील ९ गावे अशा एकूण १२४ गावांचा समावेश नवनगर विकास प्राधिकरणात केला आहे.
कसा असणार मास्टर प्लॅन?
तिसऱ्या मुंबईत आयटी पार्क, लॉजिस्टिक पार्क यांचा समावेश असेल. तसेच रहिवासी जागांसाठी आरक्षण प्रस्तावित केले जाईल. यातून या भागात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
कसे असेल नवीन शहर?
६२ टक्के जागा ओपन स्पेसेस असतील. त्यामध्ये ग्रीन झोन, फॉरेस्ट झोन आणि इको सेन्सिटिव्ह भागांचा समावेश असेल.
हे शहर चौथ्या पिढीतील शहर असेल. त्यामध्ये पर्यावरणाला हानिकारक उद्योग नसतील.
हायटेक इंडस्ट्री, आयटी, उद्योग असतील
राज्य सरकारला सप्टेंबरमध्ये प्रस्ताव सादर केला होता. १५ ऑक्टोबरला याला मान्यता मिळाली. त्यानुसार प्रकल्पावर काम सुरु केले असून त्याचा मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी सल्लागार नेमणार आहोत. ही नेक्स्ट जनरेशन सिटी असेल. – डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए