महाड- रस्त्यावरून धावत्या कारचा “बर्निंग थरार” आज (बुधवार) सकाळी महाड शहराजवळील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर घडला. या कारमध्ये प्रवास करणारे तिघेजण सुदैवाने बचावले असून, या घटनेमध्ये कार मात्र संपूर्णपणे जळून खाक झाली आहे.
चेतन ढोबळे, मल्हार निकम, हिमांशू तिवारी हे तीन पर्यटक पुण्यावरून खास कोकण फिरण्यासाठी आले होते.
बुधवार 25 डिसेंबर 2024 रोजी अलिबागवरून मालवणच्या दिशेने प्रवास करीत असताना सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांची फोक्सवॅगन कंपनीची एम.एच १२-जे एन ६८६८ क्रमांकाची ही कार वीर गावच्या हद्दीत आली. अचानक कारमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड होऊन शॉर्टसर्किट झाल्याने अचानक कारने पेट घेतला. या दरम्यान वेळीच हे तिघेही कारमधून सुरक्षित बाहेर पडल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेची माहिती मिळताच महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस तसेच महाड नगर परिषद अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. परंतु तोपर्यंत ही कार मात्र संपूर्णपणे जळून खाक झाली होती. या घटनेचा अधिक तपास महाड तालुका पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.