हत्येचा व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवून केला निषेध
खेड : शहरानजीक देवणे पूल परिसरातील नारिंगी नदी पात्रात गोवंशाचे अवयव आढळल्यानंतर हे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करत मंगळवारी खेडमधील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवून घटनेचा निषेध केला. त्याचबरोबर उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांना निवेदन देऊन याप्रकरणी कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
गोवंश हत्येच्या निषेधार्थ मंगळवारी सकल हिंदू बांधवांकडून खेड बाजारपेठ बंदची हाक देण्यात आली होती. त्याचबरोबर सकाळी हुतात्मा अनंत कान्हेरे चौक येथून मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते. परंतु सोमवारी सायंकाळी खेड पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवत या घटनेशी निगडित असलेल्या तीन संशयितांना अटक केली आहे. त्यानंतर पोलिसांनी हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून सहकार्याचे आवाहन केल्याने मोर्चा रद्द करण्यात आला. मात्र, व्यापाऱ्यांनी खेड बाजारपेठ बंद ठेवून घटनेचा निषेध केला.
त्यानंतर खेड पोलिस स्थानकात बांधवांनी एकत्र येत उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांना निवेदन देण्यात आले. सर्व व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी. आम्ही या प्रकरणाची निगडित सर्व संशयितांना अटक केली आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन राजमाने यांनी दिले.
यावेळी पोलिस निरीक्षक नितीन भोयर, शिंदेसेना तालुकाप्रमुख सचिन धाडवे, चंद्रकांत कदम, शहरप्रमुख कुंदन सातपुते, भूषण चिखले, वैजेश सागवेकर, भूषण काणे, सतीश चिकणे, अनिकेत कानडे यांच्यासह हिंदू बांधव उपस्थित होते.