रत्नागिरी : जिंदल पोर्ट कंपनीच्या आवारात झालेल्या वायूगळतीची चौकशी मंगळवारी (ता. २४) केमिकल इंजिनिअरकडून सुरू झाली. त्यांनी इथेनॉल मरकॅप्टनची जिथून गळती झाली तेथून ते शाळेपर्यंतच अनेक नमुने घेतले आहेत. चार दिवसांत त्याचा अहवाल दिला जाईल. त्यानंतर नेमकी कशाची गळती झाली आणि त्याची तीव्रता काय होती, हे स्पष्ट होणार आहे. चौकशी समितीचे अध्यक्ष अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे आणि समन्वयक तथा प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्या नेतृत्वाखालील समितीच्या उपस्थितीत ही तपासणी झाली.
केमिकल इंजिनिअर प्रा. मनीषकुमार यादव यांच्यामार्फत ही तांत्रिक चौकशी सुरू आहे. जिंदल पोर्ट कंपनीच्या परिसरात असलेल्या एलपीजी गॅस टँकर पार्किंग प्लांटमधून ही गळती झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या पुढे आले होते. एलपीजी गॅसला वास नसतो. त्याची गळती झाल्यास ते लक्षात यावे यासाठी त्यामध्ये इथेनॉल मरकॅप्टन हा वायू मिसळण्यात येतो. त्यामुळे गळती झाल्याचे त्याच्या वासावरून लक्षात येते. १२ डिसेंबरला झालेल्या या वायूगळतीची तीव्रता एवढी होती की, जवळपास असलेल्या माध्यमिक विद्यामंदिरमधील सुमारे ८० मुलांना त्याची बाधा झाली. त्यांना श्वसनाचा, पोटदुखी, डोकेदुखी, मळमळणे असा त्रास सुरू झाला.