देवरुख:-देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयातील आयुष निलेश आगरे(१२वी संयुक्त- वाणिज्य) आणि विक्रम चंद्रकांत घाग(१२वी कला) यांची १९ वर्षाखालील ४थ्या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट चॅम्पियन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या राष्ट्रीय स्पर्धा मथुरा, उत्तर प्रदेश येथे दि.२७ ते दि. ३० डिसेंबर, २०२४ या कालावधीत आयोजित केल्या जाणार आहेत.
आयुष आगरे आणि विक्रम घाग यांनी रत्नागिरी जिल्हा टेनिस क्रिकेट संघातून खेळताना नाशिक येथील महाराष्ट्र राज्य स्पर्धेत उत्तम कामगिरी केल्यामुळे त्यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. नाशिक येथील राज्य स्पर्धेत विविध जिल्ह्यांचे ३६ संघ सहभागी झाले होते. आयुष आगरे या संघामध्ये प्रमुख फलंदाज(बॅट्समन) तर विक्रम घाग जलदगती गोलंदाज(फास्ट बॉलर) असणार आहे.
आयुष आणि विक्रम यांनी मिळवलेल्या उत्तम यशासाठी महाविद्यालयात छोटेखानी सत्कार समारंभाचे आयोजन करून त्यांना राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी दोन्ही विद्यार्थ्यांना सन्मानित करून महाविद्यालयाच्यावतीने राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संस्था उपाध्यक्ष कृष्णकुमार भोसले, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, प्रा. सुवर्णा साळवी, कनिष्ठ विभाग जिमखाना प्रमुख प्रा. सानिका भालेकर, प्रा. विजय मुंडेकर, प्रा. सुनील वैद्य, प्रा. अभिनय पातेरे, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा. धनंजय दळवी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यशस्वी दोन्ही विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभुदेसाई आणि राहुल फाटक यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.