रायगड : जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील चिंचवली येथे किरकोळ वादातून मराठा समाजाचे नेते अनिल भोसले यांच्यावर जीवघेणा चाकू हल्ला करण्यात आला असल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली असून यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. या घटनेची तात्काळ दखल घेऊन पोलिसांनी आरोपींला अटक केली आहे. जखमी अनिल भोसले यांच्यावर पनवेल येथील रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत.
अनिल भोसले हे मराठा समाजाचे नेते असून ते रविवारी लग्न समारंभ करून परत येत असताना संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास भिवपुरी रेल्वे स्टेशन जवळील चिंचवली रेल्वे गेट जवळ वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीत चिंचवली गावातील मनीष भगत याची देखील गाडी थांबली होती, वाहतूक कोंडीतून गाडी काढताना अनिल भोसले आणि मनीष भगत यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली, याचा राग मनामध्ये धरून मनीष भगत यांनी भोसले यांच्यावर जीव घेणा हल्ला केला त्यावेळी भगत यांच्याबरोबर अन्य चौघेजण होते. त्यानंतर भगत यांनी भोसले यांच्यावर चाकू हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले, तशाही अवस्थेत जीव वाचवण्यासाठी त्यांनी आपले घर गाठले. त्यानंतर त्यांना कर्जत उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
भोसले यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिसांना समजताच नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी शिवाजी ढवळे यांनी मनीष घरात याला रात्री उशिरा ताब्यात घेतले, त्याच्यावर नेरळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, जखमी भोसले यांना अधिक उपचारासाठी पनवेल मधील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.
अनिल भोसले यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सर्व थरातून निषेध व्यक्त केला जात असून या घटनेचा अधिक तपास कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी डी.डी. टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.