रत्नागिरी : जिल्ह्यातील २ हजार युवकांची मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत नेमणूक करण्यात केली आहे. एक महिना मानधन मिळाल्यानंतर पुढील तीन महिने मानधनच दिले गेलेले नाही. मानधन न मिळाल्याने त्यांच्यात प्रचंड नाराजी पसरली आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत जिल्ह्यात सप्टेंबरपासून युवकांची नियुक्ती करण्यात येत आहे. निवडणुकीपूर्वी या अंतर्गत २ हजार युवकांना विविध शासकीय, निमशासकीय, खासगी अस्थापना, कारखान्यांमध्ये नेमणुका देण्यात आल्या
आहेत. यामध्ये पदवीधरांना दहा हजार तर बारावी उत्तीर्ण युवकांना सात हजार रुपये मानधन दिले जाते. प्रशिक्षणार्थी युवक जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, नगरपालिका, पाटबंधारे, एसटी, आरोग्य विभाग, समाजकल्याण यांसह विविध विभागात काम करत आहेत. लाडकी बहीण योजनेनंतर तरुणांमध्ये नाराजी पसरल्याने मुख्यमंत्र्यांनी लाडका भाऊ म्हणून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सप्टेंबर २०२४ मध्ये सुरू केली.
युवक रुजू झाल्यानंतर पहिल्या महिन्याचे वेतन देण्यात आले; मात्र त्यानंतर दोन ते तीन महिन्याचे मानधन जमा करण्यात आले नसल्यामुळे युवकांमध्ये नाराजी पसरली आहे.