तलवार घेवून योद्ध्याच्या भूमिकेमध्ये असणारी मानवी आकृती आणि मानवी हाताचा पंजा
राजापूर : तालुक्यातील खरवते येथील सड्यावर मानवी देहाची ठेवण असणारे तलवार घेवून योद्ध्याच्या भूमिकेमध्ये असणारी मानवी आकृती आणि मानवी हाताचा पंजा अशी दोन कातळशिल्प आढळून आली आहेत.
सड्यावरील जांभ्या दगडाच्या कातळामध्ये कोरलेली ही वैशिष्ट्यपूर्ण कातळशिल्प खरवतेच्या सड्यावर पहिल्यांदा आढळून आली असून त्याद्वारे खरवतेच्या सडा परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधतता आणि मानवाच्या हजारो वर्षापूर्वीच्या वास्तव्याच्या पाऊलखुणा दृष्टीक्षेपात आल्या आहेत.
सड्यावरील जांभ्या दगडाच्या कातळामध्ये कोरलेली ही वैशिष्ट्यपूर्ण कातळशिल्प खरवतेच्या सड्यावर पहिल्यांदा आढळून आली असून त्याद्वारे खरवतेच्या सडा परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधतता आणि मानवाच्या हजारो वर्षापूर्वीच्या वास्तव्याच्या पाऊलखुणा दृष्टीक्षेपात आल्या आहेत.
राजापूर तालुक्यातील बारसू, देवाचेगोठणे, देवीहसोळ आदी भागातील सड्यावर मानवाच्या हजारो वर्षापूर्वीच्या वास्तव्याच्या पाऊलखुणा सांगणारी वैशिष्ट्यपूर्ण कातळशिल्प गेल्या काही वर्षामध्ये आढळून आली आहे. त्यानंतर खरवते येथे प्रथमच दिसून आलेल्या या कातळशिल्पांमुळे पुन्हा एकदा राजापूरचे नाव देशातच नव्हे तर, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचले आहे.
निसर्गयात्री संस्थाप्रमुख, कातळशिल्प संशोधक सुधीर रिसबुड, धनंजय मराठे आणि खरवते येथील जेष्ठ ग्रामस्थ गंगाराम चौगुले यांनी दिलेल्या माहितीनुसार सरपंच अभय चौगुले, उपसरपंच गौरव सोरप, ग्रामपंचायत सदस्य किशोर चौगुले, संतोष चौगुले, जान्हवी माटल, सत्यवती बावकर, वैशाली चौगुले, ग्रामपंचायत अधिकारी नेहा कुडाळी, ग्रामपंचायत कर्मचारी देवीदास उबाळे, संजय माटल, केंद्रचालक भक्ती माटल, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षक चैत्रा गुरव, पर्यावरणप्रेमी प्रशांत चौगुले या टीमने या कातळशिल्पांचा शोध घेण्यासाठी शोध मोहिम राबविली.
त्यातून, या वैशिष्ट्यपूर्ण कातळशिल्पांचा शोध लागल्याची माहिती ग्रामपंचायत अधिकारी सौ. कुडाळी यांनी दिली. ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गंत या कातळशिल्पांसह सड्यावरील जैवविविधततेचे जतन आणि संवर्धन केले जात असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या कातळशिल्पांसह कृषी पर्यटनास चालना देणारे भास्कर गुरसाळे यांचे पुष्कर आम्रवेल कृषी पर्यटन केंद्र खरवते परिसरातील पर्यटनाला अन् त्यातून निर्माण होणार्या रोजगाराला चालना देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
खरवतेच्या सड्यावर आढळून आलेले कातळशिल्पांमध्ये मानवी देहाची ठेवण असणारे तलवार घेवून योद्ध्याच्या भूमिकेमध्ये असणारी मानवी आकृती आणि मानवी हाताचा पंजा यांचा समावेश आहे. मानवाकृती कातळशिल्प 7 फूट लांब आणि 4 फूट रूंदीच्या आकाराचे आहे. तर, मानवी हाताचा पंजा 1 फुट लांब आणि अर्धा फुट रूंद आकाराचा आहे.
“राजापूूर पंचायत समितीने आयोजित केलेल्या पर्यटन विकास सभेमध्ये खरवते येथील कातळशिल्प असल्याची माहिती पुढे आली होती. त्यानुसार, खरवते येथील जेष्ठ ग्रामस्थ गंगाराम चौगुले यांच्याकडून अधिक माहिती घेतल्यानंतर सरपंच अभय चौगुले, उपसरपंच गौरव सोरप अन्य ग्रामपंचायत पदाधिकारी आणि पर्यावरणदूतांच्या सहकार्याने शोध घेतला ही कातळशिल्प आढळून आली आहेत. माझी वसुंधरा अभियानांतर्गंत कातळशिल्पांसह जैवविविधततेचे जतन आणि संवर्धन केले जात आहे.