खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील जगबुडी नदीपात्रात कोसळलेला टँकर बाहेर काढण्यासाठी गुप्वारी सकाळच्या सुमारास कशेडीतील वाहतूक पोलिसांनी ३ क्रेन तैनात केल्या. तब्बल ४ तासांच्या अथक प्रयत्नाने टँकर बाहेर काढण्यात यश येताच साऱ्याच यंत्रणांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या टँकर चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटल्याने थेट जगबुडी नदीपात्रात कोसळला. चालकाने तातडीने उडी मारल्याने सुदैवाने बचावला आहे. त्याला गंभीर दुखापती झाल्या असून उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुलावरील संरक्षक भिंतीचा कठडा तोडून थेट नदीपात्रात कोसळलेला टँकर बाहेर काढण्याचे यंत्रणांसमोर मोठे आव्हान होते. या अपघातामुळे पुलावरील कठड्याचीही मोठी नासधूस झाली आहे. कशेडीतील वाहतूक
पोलिसांनी गुरूवारी सकाळच्या सुमारास नदीपात्रात कोसळलेला टँकर बाहेर काढण्यासाठी ३ क्रेन तैनात केल्या. दोन्ही पुलाच्या मध्यभागातील नदीपात्रात कोसळलेला टँकर बाहेर काढताना यंत्रणांची दमछाक झाली. यामुळे एका पुलावरील वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती. सकाळी ११.३० च्या सुमारास टँकर नदीपात्राबाहेर काढण्यात यश आले.
विस्कळीत पाणीपुरवठा अखेर पूर्ववत
भरणे येथील जगबुडी नदीपात्रात कोसळलेल्या टँकरमुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भरणे जॅकवेल येथील जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण झाला होता. टँकर बाहेर काढल्यानंतर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी तातडीने गुरूवारी सकाळी १२च्या सुमारास जलवाहिनी दुरूस्तीचे काम हाती घेतले होते. दुरूस्ती झाल्यानंतर सायंकाळच्या सुमारास विस्कळीत पाणीपुरवठा पूर्ववत होताच नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.