खेड : कोकण रेल्वे मार्गावरील कोंडीवली-आंजणी रेल्वेस्थानकादरम्यान नेत्रावती एक्स्प्रेसखाली झोकून देत आत्महत्या करणाऱ्या तरूणाची ओळख पटवण्यात अखेर गुरूवारी पोलीस यंत्रणेला यश आले. सौरभ पके (२३, रा. कुवारसाई-खेड) असे मृत तरूणाचे नाव आहे. कोंडीवली- आंजणी रेल्वे रूळानजीकच्या झाडीझुडपात बुधवारी सायंकाळच्या सुमारास २५ ते ३० वयोगटातील तरूणाचा मृतदेह आढळला होता. गस्तीदरम्यान रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले होते. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. गुरूवारी मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. तरूणाने नेत्रावती एक्स्प्रेसखाली झोकून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण समजू शकले नाही. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.