गुहागर : गुहागर चौपाटीवर मित्रांसोबत कराड येथून आलेल्या तरुणाला समुद्रात आंघोळ करताना अंदाज न आल्याने बुडणाऱ्याला गुहागर नगरपंचायतीच्या जीव रक्षक प्रदेश तांडेल याने वाचवल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजता घडली. तांडेल याला निहाल तोडणकर, संगम मोरे, सदाम बागकर यांनी सहकार्य केले. या तरुणांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे तरुणाचा जीव वाचल्याबद्दल किनाऱ्यावरील सर्वांनी कौतुक केले.
गुहागर हे कोकणातील पर्यटन केंद्रबिंदू म्हणून विकसित होत आहे. तालुक्याला लाभलेल्या अथांग समुद्रचौपाटीमुळे पर्यटक गुहागरात मोठया संख्येने हजेरी लावतात. डिसेंबर महिन्यात पर्यटकांचा ओघ जास्तच असतो. गुहागर चौपाटीची आणि स्वच्छ समुद्राची भुरळ ही घाटमाथ्यावरील पर्यटकांना अधिक असते. मंगळवारी कराड येथून अजित डुंबरे हे आपल्या अन्य ११ मित्रांसोबत गुहागर फिरायला आले होते. सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास गुहागर पोलीस स्थानकाच्या मागील चौपाटीवर मौजमज्जा करण्यासाठी आले होते. त्यातील काहीजण समुद्रात आंघोळीसाठी उतरले. अजित डुंबरे यांना चांगले पोहता येते. परंतु, तोडलेल्या जेटी शेजारी पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. आपला मित्र बुडतो हे कळताच त्याच्या सहकार्यांनी आरडाओरोड केली. याचवेळी किनाऱ्यावर असलेल्या संगम मोरे याच्या हा प्रकार लक्षात आले. त्याने लगेचच किनाऱ्यावरील नगरपंचायतीचा जीव रक्षक प्रदेश तांडेल याला हा प्रकार सांगितला. तांडेल याने क्षणाचाही विलंब न घालवता रेस्क्यू बोर्ड घेऊन समुद्रात गेला. अजित डुंबरे याला काही क्षणात किनाऱ्यावर आणले. त्याला बाहेर काढण्यासाठी किनाऱ्यावरील सहकाऱ्यांनी दोरी टाकून मोठी मदत केली. अजित याने बाहेर आल्यावर प्रदेश तांडेल आणि सहकार्यांचे आभार मानले.