रत्नागिरी : शहरातील पटवर्धनवाडीतील बाष्टे कंपाउंडमधील विहिरीत पडलेल्या पाड्याला जीवदान देण्यासाठी नागरिकांसह रत्नागिरी नगरपालिका आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अग्निशमन दलाचे केलेल्या चार तासांच्या प्रयत्नाला अखेर यश आले. या पाड्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
पटवर्धनवाडीतील बाष्टे कंपाउंडमधील विहिरीत गायीचा पाडा पडल्याचे भाजप किसान मोर्चाचे प्रसाद बाष्टे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अॅड. ज्ञानेश पोतकर यांच्याशी संपर्क साधला. तिथून सूत्रे हलली आणि रत्नागिरी नगर पालिकेसह महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. विहीर खोल असून दहा फुटांवर पाणी असते. विहीर प्रचंड खोल असल्यामुळे पाड्याला वाचवण्याचे कार्य खूपच जोखमीचे होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी सेफ्टी बेल्ट विहिरीत टाकून लॉक करण्याचा प्रयत्न केला; पण तो यशस्वी झाला नाही. त्यानंतर जेसीबी चालक संजू राठोड यांच्या मदतीने स्वप्नील पारकर आणि उसेब डांगीकर हे विहिरीत उतरले. त्यांनी पाड्याच्याभोवती सेफ्टी बेल्ट अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने व्यवस्थित बांधला. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर पाड्याच्याभोवती सेफ्टी बेल्ट बांधून जेसीबीच्या आणि अग्निशमन दलाच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. रात्रीपासून विहिरीत पोहून पाडा खूपच दमला होता. त्यानंतर त्याला टेम्पोने सोमेश्वर शांतीपीठ गोशाळेत नेण्यात आले.
ही मोहीम रत्नागिरी अग्निशमन दलाचे नरेश मोहिते, रमेश नार्वेकर, श्रीकृष्ण ढेपसे, एमआयडीसी अग्निशमन दलाचे आनंद राऊत, दिलीप दळवी, राजू मुळे, राकेश बाबर, प्रमोद राठोड यांनी फत्ते केली. त्यांना राजेश आयरे, ज्ञानेश पोतकर, रोहन वारेकर, योगेश हळदवणेकर, अभिजित चाळके, पद्मा पटवर्धन, जेसीबी चालक संजू राठोड यांचे सहकार्य मिळाले.