ग्राहकांना स्वतःचा नेमका वीज वापर कळून येणार
रत्नागिरी : वीज ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी व वीज गळती कमी करण्यासाठी महावितरणने स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात स्मार्ट मीटर पहिल्या टप्प्यात शासकीय कार्यालयांना बसवण्यात येत आहेत. जिल्ह्यात एकूण १६ हजार १९५ शासकीय कार्यालयांपैकी आतापर्यंत ३,९४२ कार्यालयातून स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत.
महावितरणच्या उपकेंद्रात ३३० फिडरवर स्मार्ट मीटरपैकी २५३ मीटर बसवण्यात येणार आहे. तसेच ८ हजार ८६५ रोहित्रापैकी ६६३ ठिकाणी स्मार्ट मीटर बसवले आहेत. महावितरणची थकबाकी सातत्याने वाढत असल्याने स्मार्ट मीटरचा पर्याय शोधण्यात आला आहे. स्मार्ट मीटरमुळे वीज वापरानुसार बिल येणार आहे, शिवाय वीज चोरीला आळा बसणार आहे. वीज बिलातील त्रुटी दूर होऊन तक्रारी कमी होणार आहे. मीटरमध्ये फेरफार झाल्यास त्याची सूचना तातडीने महावितरणच्या मुख्यालयाला मिळणार आहे.
स्मार्ट मीटरमध्ये आपण किती विजेचा वापर केला आहे, याची माहिती वीज ग्राहकाला त्याच्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून पाहता येणार आहे. नवीन स्मार्ट मीटर ग्राहकांना मोफत दिले जाणार आहेत. केंद्र सरकारचे अनुदान व महावितरणकडून हे मीटर उपलब्ध करून दिले जातील.
विजेवरील खर्चावर ठेवता येणार नियंत्रण
सद्यस्थितीत वीज ग्राहकांनी वीज वापरल्यानंतर दरमहा त्यांच्या मीटरचे रीडिंग घेतले जाते. त्यानुसार बिल पाठवले जाते एखाद्या ग्राहकाने नेहमीपेक्षा जास्त वीज वापरल्यास मोठे बिल येते. त्यामुळे ग्राहकांचे आर्थिक नियोजन बिघडते मीच वापरले असल्याने त्याचे बिल भरण्याशिवाय पर्याय नसतो, मात्र स्मार्ट मीटरच्या बाबतीत वीज ग्राहक आधी पैसे भरून तेवढ्याच रकमेची वीज वापरणार असल्याने ग्राहकांना नियोजन करून विजेवरील खर्च पूर्णपणे नियंत्रणात ठेवता येणार आहे.
स्मार्ट मीटरचे फायदे
◼️स्मार्ट मीटर बसविल्यानंतर ग्राहकांचा नेमका वीज वापर स्पष्ट होणार आहे.
▪️विजेची चोरी करण्यासाठी मीटर मधील फेरफार आला आळा बसणार आहे
▪️ग्राहकांना स्वतःचा नेमका वीज वापर करून वीज बचतीची सवय लागणार आहे