रत्नागिरी : शेतकऱ्यांकडील दुधाळ जनावरांवर तत्काळ उपचार व्हावेत यासाठी मंडणगड आणि रत्नागिरी या दोन तालुक्यांत फिरता पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करण्यात आला; मात्र पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी या उपक्रमाचे तीनतेरा वाजले आहेत.
महाराष्ट्र शासन आणि पशुसंवर्धन विभागाने मंडणगड आणि राजापूर या दोन तालुक्यांसाठी ‘फिरता पशुवैद्यकीय दवाखाना” सुविधा उपलब्ध करून दिली होती. शेतीला जोडधंदा म्हणून बहुतांश शेतकऱ्यांकडील दुधाळ जनावरांवर तत्काळ उपचार होण्यासाठी हा दवाखाना उपयुक्त ठरणार आहे. दुर्गम आणि डोंगराळ, आदिवासी भागासाठी फिरता पशुवैद्यकीय दवाखाना शेतकऱ्यांच्या पथ्थ्यावर पडणारा आहे. ज्या भागात दळणवळणाच्या अपुऱ्या सुविधा आहेत त्या भागासाठी ही सुविधा फायदेशीर ठरणारी आहे. गतवर्षी फिरता पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करण्यात आला होता. या फिरत्या दवाखान्यामुळे असंख्य शेतकऱ्यांच्या दारात आजारी पशुंवर उपचाराची सुविधा मिळाली; मात्र, डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे फिरता दवाखाने बंद ठेवण्यात आले आहेत. मागील काही वर्षांपासून पशुवैद्यकीय चिकित्सालयात पशुधन विकास अधिकारी नसल्यामुळे पशुधन धोक्यात आले आहे. अनेक तालुक्यात मोठ्या संख्येने जनावरे आजारी असतानाही त्यांच्यावर उपचार करण्यासाठी प्रभावी यंत्रणा नाही. पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयात गेल्या वर्षांपासून महत्वाच्या अधिकाऱ्यांची पदे रिक्त असून त्याचा थेट परिणाम जनावरांच्या उपचारांवर होत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पशुवैद्यकीय चिकित्सालयाच्या विशाल इमारती बांधल्या आहेत. तिथे श्रेणीनुसार पशुसंवर्धन सेवा पुरवली जाते; मात्र, त्यातील चिकित्सालयात पर्यवेक्षक आणि अधिकारी नसल्यामुळे सध्या त्या निरूपयोगी ठरत आहेत. घटसर्प, एकटांग्या रोग तसेच लाळ खुरकत, कृत्रिम रेतन, आजार हटवण्यासाठी लसीकरणसारख्या राबवण्यात येणाऱ्या मोहिमांकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे शेतकरीवर्गातून संताप व्यक्त होत आहे.