रायगड : रायगड जिल्ह्यातील कळंबोली येथे पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात 17 लाखांची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्याने पंचेचाळीस हजार रुपये रोख रक्कम व सोने चांदिसह 16 लाख ९५ हजार रूपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यात चोरांनी पोलीस कर्मचाऱ्यांची घरे लक्ष केल्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे. पोलिसांची घरे सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य व्यक्तींची घरे कशी सुरक्षित राहणार ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. चोरट्यांनी पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातून रोकड आणि मौल्यवान वस्तू सोबत देवाच्या चांदीच्या मूर्तीची चोरी केली. या गुन्ह्याची नोंद कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत कळंबोली पोलीस ठाण्यात अमोल परशुराम म्हात्रे, (वय ४१) यांनी फिर्याद दाखल केली आहे… अमोल म्हात्रे हे सेक्टर दोन ई कळंबोली येथे राहत असून त्यांच्या भावाच्या मुलीचा वाढदिवस असल्याने म्हात्रे आपल्या कुटुंबीयांसह पेण, सोनखार येथे दहा डिसेंबर रोजी गेले होते… ११ डिसेंबर रोजी पहाटे सहाच्या सुमारास त्यांच्या रूमच्या वर राहणाऱ्या भाडेकरू यांनी तुमच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडण्यात आले असल्याची माहिती म्हात्रे यांना कळवली.
सदर घरफोडी ही दिनांक १०/१२/२०२४ रोजी रात्री ०८:०० ते दिनांक ११/१२/२०२४ रोजी पहाटे ०५:४५ वाजताच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत कळंबोली पोलीस ठाणे येथे ४८१/२०२४, बी. एन. एस. ३३१ (४) ३०५ प्रमाणे भादवी कलम ४५७ ३८० नुसार दाखल करण्यात आला आहे.