आई – वडिलांचे अविरत कष्ट, पालेभाजीची लागवड, घराजवळच विक्री केंद्र
संगमेश्वर :- कोकणात थंडीचे दिवस सुरू झाले आहेत या दरम्यान कोकणामध्ये भातशेती पूर्ण झाली असून हिवाळी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो.संगमेश्वर तालुक्यातील लोवले येथील युवा शेतकरी शुभम दोरकडे याने आपल्या शेतात हिरवी मिरची, भेंडी, पालेभाज्या यांची लागवड केली आहे.गेली पाच वर्षे तो आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहे. त्यामध्ये कलिंगड लागवडीचा देखील आहे.अपार कष्ट करून तो या कलिंगड व्यवसायातून आर्थिक उन्नती साधत आहे. यासाठी त्याला आई-वडिलांसह बहिणीचेही सहकार्य लाभत आहे.
शुभम दोरकडे याने कलिंगड शेतीकडे व्यवसाय म्हणून पहिले आहे.नोकरीच्या शोधात न पडता त्याने गेली पाच वर्षे आपल्या जागेत कलिंगड लागवड केली आहे.नोव्हेंबर महिन्यात कलिंगड शेतीसाठी आवश्यक असलेलें मळे तयार करून ठिंबक सिंचन द्वारे जल व्यवस्थापन करत त्याने कलिंगड लागवड केली आहे. सध्या त्याच्या शेतात कलिंगड रोपं वाढत आहेत.
कलिंगड प्रामुख्याने हिवाळी हंगामात होतं असल्याने थंडीचा पोषक परिणाम यावर होतो नदिच्या पाण्यावर कलिंगड शेती प्रामुख्याने केली जात असल्यामुळे फळांमध्ये गोडवा असतो त्यामुळे साहजिकच यांना मागणीही जास्त असते.
आतापासून पुढिल तीन चार महिने कलिंगड शेतीकडे जास्त लक्ष द्यावे लागते पुरेसे पाणी,किड लागू नये म्हणून योग्य ती औषधं फवारणी महत्वाची असते.
फेब्रुवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात कलिंगड तयार होऊन विक्रिसाठी उपलब्ध होणार आहेत. शुभम याने आपल्या घराजवळच शेतमालाची विक्री केंद्र उभारले असून या ठिकाणी तो विविध प्रकारची फुलझाडे देखील विकत आहे. कलिंगड, भाजीपाला लागवड, नर्सरी आणि विक्री केंद्र यासाठी वडील संतोष, आई सविता बहीण प्रणिता यांचे शुभमला मोलाचे सहकार्य लाभते.
रासायनिक ऐवजी सेंद्रिय शेतीवर भर
मी स्वतः दापोली कृषी विद्यापीठातून कृषी पदवीधर झालो आहे. त्यामुळे या पिकांबद्दल योग्य ती माहिती आहे . या मध्ये मला माझी आई बाबा आणि बहिण यांच मोलाचं सहकार्य लाभत आहे. कलिंगड लागवड असो अथवा भाजीपाला या सर्वांसाठी रासायनिक खता ऐवजी आपण सेंद्रिय खतांचा वापर करत आलो आहोत. रासायनिक पेक्षा सेंद्रिय खताने भाजीपाला अथवा कलिंगडे अधिक दर्जेदार आणि चविष्ट होत असल्याचा आपला अनुभव आहे.
—- शुभम दोरकडे, युवा शेतकरी