चालकाला झोप अनावर झाल्याने अपघात
खेड : मुंबई गोवा महामार्गावरील खेड येथील जगबुडी पुलावरून टँकर 100 फूट खोल नदीत कोसळून मोठा अपघात झाला. हा अपघात आज बुधवार 18 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास झाल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. चालकाला झोप अनावर झाल्याने टँकर थेट नदीत कोसळला. सुदैवाने या मोठया अपघातात टँकर चालक बचावला आहे.
सविस्तर वृत्त असे की, टँकर चालक मुंबईच्या दिशेने चालला होता. जगबुडी नदीत आल्यानंतर त्याला झोप अनावर झाल्याने टँकरवरील ताबा सुटला. टँकर नदीत कोसळताना चालकाने लगेच उडी मारल्याने तो यातून बचावला आहे. हा टँकर उभाच सरळ खाली कोसळल्याने टँकरचे नुकसान झाले नाही. मात्र दोन्ही दरवाजाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर सकाळी या ठिकाणी बघ्याची गर्दी वाढली होती. अपघाताची माहिती मिळताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. टँकर वरती काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.