दापोली : तालुक्यातील हर्णे येथून तस्करी करताना जप्त केलेले डिझेल व बोट यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आर्मगार्ड म्हणजेच शस्त्रधारी पोलिसांवर सोपवण्यात आली आहे. सदर बोट दाभोळ जेटी येथे उभी करण्यात आली आहे.
हर्णे बंदरातून तस्करी करण्याकरिता आलेल्या या बोटीवर दापोली पोलिसांनी धडक कारवाई करत रविवारी छापा मारला. या बोटीमधील सुमारे 14 खणांमधील 30 हजार लिटर डिझेल सदृश द्रावण ताब्यात घेतले. दाभोळ येथे जेटी असल्यामुळे सदर बोट व्यवस्थित उभी करण्याकरिता तेथे पाठवण्यात आली. दाभोळ पोलीस स्थानकाच्या कार्यकक्षेत बोट ठेवण्यात आली असून सदर बोटीवर लक्ष ठेवण्याकरिता आर्म गार्डची म्हणजे शस्त्रधारी पोलिसांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदर बोटीवर असणाऱया डिझेलचा साठा तसेच बोटीमध्ये असल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. बोट मालकाने बोटीची मागणी केल्यास किंवा न्यायालयाने तसे आदेश दिल्यास बोट मालकाला बोट परत दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशावेळी जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये पुरवठा अधिकाऱ्यामार्फत तस्करी करण्याकरिता आणलेल्या डिझेल सदृश द्रावणाचा लिलाव होऊन विक्री केली जाऊ शकते असे जाणकारांचे मत आहे. याप्रकरणी तस्करीमध्ये सहभागी झालेल्या संबंधित आरोपींना नोटीस बजावण्यात आल्याचे दापोली पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे करीत आहेत.”