दापोली : तालुक्यातील मुरुड येथे कराड येथून पर्यटनासाठी आलेल्या शशिकांत नारायण कांबळे (शनिवार पेठ, पाटण कॉलनी) या 50 वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 8ः30 वाजता घडली.
शशिकांत कांबळे हे आपले अन्य मित्र संजय अहिवळे, अल्ताफ खान, अमित मोरे, अजिंक्य पवार, किरण पांढरपट्टे यांच्यासमवेत 16 डिसेंबर रोजी पर्यटनासाठी दापोली येथील मुरुड येथे आले. संध्याकाळी आल्यानंतर सर्वजण मुरुड येथील रॉयल सी या हॉटेलमध्ये राहण्यासाठी थांबले. सकाळी लवकर उठून शशिकांत कांबळे, अल्ताफ खान, अमित मोरे हे हर्णे येथे मासे खरेदी करिता गेले. तेथून आल्यानंतर हॉटेलमध्ये मासे शिजवण्याकरिता देऊन आंघोळीकरिता खोलीत गेले. त्यावेळी शशिकांत कांबळे यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे त्यांच्या समवेत असणाऱ्या मित्रांनी सांगितले. शशिकांत कांबळे यांना तत्काळ उपचाराकरिता आसूद येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथून त्यांना दापोलीमधील भागवत हॉस्पिटलमध्ये तत्काळ दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यानी तपासणी करून ते मृत झाल्याचे घोषित केले. कांबळे यांच्या पशात पत्नी, मुलगा, मुलगी ,आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. दापोली पोलीस स्थानकात उशिरापर्यंत याची खबर नोंद करण्याचे काम सुरू होते.