चिपळुणातील सावकारावर गुन्हा दाखल
चिपळूण : व्याजाची रक्कम 1 लाख 45 हजार रुपये दरमहिना भरण्यास नकार दिल्याने यातूनच एका सावकाराने कपडे विक्रेत्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी सोमवारी सावर्डे पोलीस ठाण्यात सावकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव भालचंद्र सावंत असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद स्वानंद शांताराम बांबाडे (38) यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वानंद बांबाडे यांचे सावर्डे बाजारपेठ येथे लक्ष्मी या नावाने कपडयाचे दुकान आहे. कोरोना कालावधीत दुकान बंद असल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले. त्याच्या ओळखीचा वैभव सावंत हा व्याजी पैसे देण्याबाबत व्यवहार करत असल्याबाबत माहित असल्याने बांबाडे यांनी वैभव याच्याकडून सप्टेंबर 2021 मध्ये पहिल्या आठवडयात 50,000 रुपये 10 टक्के व्याजदराने घेतले होते. त्यानंतर त्यांनी सप्टेंबर 2021 ते 23 नोव्हेंबर 2024 याकालावधीत 37 लाख रुपये फोन पे, गुगल पे, योनो, फिनो ऍपव्दारे तसेच रोख रक्कम वैभव याला व्याजासह दिली. मात्र वैभव हा अजूनही व्याजाची रक्कम शिल्लक असल्याचे सांगून दरमहिना 1 लाख 45 हजार रुपये मागत आहे. बांबाडे यांना ही रक्कम देणे शक्य नसल्याने तसा नकार त्यांनी वैभव याला दिला. त्यावेळी वैभव यांने बांबाडे यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी व घरी जावून धिंगाणा करीत जीवे मारण्याच्या धमक्या दिली. धमकी देण्याचा प्रकार पुढे आल्यानंतर याप्रकरणी बांबाडे यांनी सावर्डे पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार वैभव सावंत याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.