अनिकेत जाधव / चिपळूण
तालुक्यातील नांदगाव हायस्कूल येथे 1971 च्या भारत पाक युद्धाचा विजय दिवस साजरा करण्यात आला. या विजय दिनानिमित्त इंग्लीश स्कूल नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरात व्याख्यान व वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला नेहरू युवा केंद्राचे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक अनिकेत जाधव व नांदगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग उपस्थित होते.
या अभियानांतर्गत आंबा, फणस, काजू इत्यादी प्रकारची जवळपास 20 पेक्षा जास्त सदाहरित वनस्पती रोपांची लागवड करण्यात आली. या अभियानासाठी सह्याद्री रोपवाटिका खरवते – दहिवली येथुन आंबा व काजू ची झाडे आणली होती.
शाळेतील मुलांनी स्वतः खड्डे खोदून हे अभियान यशस्वी पणे राबविले. शाळेचे जेष्ठ शिक्षक श्री शेवाळे यांनी विद्यार्थ्यांना सदर अभियानाविषयी मार्गदर्शन करताना नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांचे स्वागत केले व विजय दिवसाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. त्यानंतर पाटील यांनी आपल्या खास अभ्यास पुर्ण शैलीत विद्यार्थ्यांना १९७१ च्या भारत पाक युध्दा विषयी माहिती देताना संपुर्ण युध्द प्रसंग मुलांसमोर उभा केला व विजय दिनाचे महत्व आपल्या व्याख्यानातून स्पष्ट केले. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री मोरे सर यांनी सदर ऊपक्रमासाठी नांदगाव हायस्कूलची निवड केल्या बद्दल अनिकेत जाधव यांचे आभार मानले. तसेच लागवड केलेली झाडे प्रत्येक वर्गाने दत्तक घेऊन त्यांचे संगोपन करण्याची संकल्पना विद्यार्थ्यां समोर ठेवली, व सर्व विद्यार्थ्यांनी या संकल्पनेवर काम करण्याचा निर्धार केला.
१९७१ च्या युध्दातील शहिद सैनिक व सैनिक अधिकाऱ्यांचे फोटो प्रत्येक झाडावर लावण्यात आले होते. व त्या झाडाचे संगोपन करून एक वेगळ्या प्रकारची श्रध्दांजली वाहण्यात आली.
वृक्षारोपण कार्यक्रम झाल्यावर विद्यालयातील सर्व मुलांना नेहरू युवा केंद्र रत्नागिरी यांचेकडून चहा, नाष्टा देण्यात आला. अशा प्रकारे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात विजय दिवस कार्यक्रम पार पडला.